Sunday, October 26, 2025
Happy Diwali

विहिरींनी तळ गाठल्याने टाकीपठार परिसरात भीषण पाणीटंचाई

विहिरींनी तळ गाठल्याने टाकीपठार परिसरात भीषण पाणीटंचाई

हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

शहापूर (वार्ताहर) : मुंबई व उपनगरांना पाणी पुरवठा करणारा शहापूर हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र 'धरण उशाला आणि कोरड घशाला', अशीच काहीशी परिस्थिती शहापूर तालुक्याची झाली असून, अतीदुर्गम व आदिवासी बहुल परिसर असणाऱ्या टाकीपठार भागात अनेक विहीरींनी तळ गाठल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

या परिसरातील मधलीवाडी, कवटेवाडी, चाफेचीवाडी, टाकीचीवाडी, कुंभचीवाडी या टाकीपठार परिसरातील प्रत्येकी वाडीमध्ये २०० च्या आसपास लोकवस्ती असणाऱ्या वाड्यांतील महिलांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा महिलांना आपल्या लहानग्यांना घरातच सोडून पाण्भयासाठी भटकंती करावी लागते. पाण्याचे एकमेव स्त्रोत असणाऱ्या विहीरी तळ गाठू लागल्यामुळे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी एक ते दीड किलोमीटर महिलांना आपला कामधंदा सोडून पायपीट करावी लागत आहे. शाळेतील मुलीही घरातील माणसांना मदत व्हावी, म्हणून शाळेला दांडी मारून पाणी भरण्यासाठी घरी थांबत असल्याची माहिती काही महिलांनी दिली.

यावेळी ग्रामस्थ हिरु जैतु किडका यांनी केवळ महिलाच नव्हे; तर पाण्यासाठी वयोवृध्दांनाही डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा शोध घ्यावा लागतो, अशी वेळ आज आली आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. तर पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता विकास जाधव ज्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे, अशा ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी टँकरची मागणी केल्यास वरिष्ठांना पत्रव्यवहार करुन तत्काळ टँकर मंजूर करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा