मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने सुरू असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा तीनच्या रखडलेल्या प्रकल्पांना वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ३३ हजार ६९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मार्च २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १०० कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर, वेगवान होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आढावा बैठकीत ‘एमयूटीपी ३ अ’च्या प्रकल्पांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच, या ‘एमयूटीपी ३ अ’ प्रकल्पासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात यावेत, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले होते. त्यानंतर एमएमआरडीएकडून १०० कोटी रुपये मिळाल्याचे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.