Friday, October 10, 2025

राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे

राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे

पनवेल (प्रतिनिधी) : महत्त्वाचे असते ही समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. आज ते उलवा नोड येथे जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने बाेलत होते.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. तसेच ‘स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२३’ पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक पार पडला. तत्पूर्वी शेलघर येथे भगत साहेब यांच्या निवासस्थानी साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी रामशेठ ठाकूर म्हणले की, भगत साहेबांनी केलेल्या कार्यामुळे हा परिसर नावाजला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. ८४ गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. स्व. जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते.

"भगत साहेबांच्या निधनानंतर त्यांचा पुतळा उभारावा असे सर्वांच्या मनात आले. पण त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार जनार्दन भगत साहेबांच्या नावाने शैक्षणिक संस्था उभारण्याचा निर्णय घेतला". - जे. एम. म्हात्रे, माजी नगराध्यक्ष.

"भगत साहेबांचे कार्य अजरामर आहे. ते अष्टपैलू नेतृत्व होते. आर्थिक आणि शारीरिक शक्तीपेक्षा सामाजिक हित त्यांना महत्वाचे होते. त्यांचे अपूर्ण कार्य त्यांचे जावई रामशेठ ठाकूर पूर्ण करत आहेत". - वाय. टी. देशमुख, उप कार्याध्यक्ष.

Comments
Add Comment