Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसांगलीच्या अवलियाची ठाण्यात विश्वविक्रमाला गवसणी!

सांगलीच्या अवलियाची ठाण्यात विश्वविक्रमाला गवसणी!

पोटावरून ३७७ वेळा दुचाकी नेण्याचा पराक्रम

ठाणे (प्रतिनिधी) : काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनतपणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाईक लागोपाठ ३७७ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी रविवारी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या विश्वविक्रमामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाईचे काम करणाऱ्या पंडित धायगुडे यांचे कौतुक होत आहे.

देशाचं नाव गिनीज बुकमध्ये न्यायचं स्वप्न होतं. २००९ पासून त्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आज ते स्वप्न पूर्ण झाल्यानं भरून पावलो, त्यामुळे मला या विश्वविक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा भावना पंडित धायगुडे यांनी विश्वविक्रमानंतर बोलताना व्यक्त केल्या. या आधीचा पंडित धायगुडे यांचा विक्रम १२२ बाईक पोटावरून नेल्याचा होता. धायगुडेंनी आपलाच रेकॉर्ड तोडत तो कितीतरी मागे सोडलाय. अर्थात, त्यामागे त्यांची इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी आहे. कराटेत ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या पंडित धायगुडे यांची २००९ पासून तयारी सुरू होती. धायगुडे यांनी याआधी देखील २५७ किलो वजनाच्या दोन बाईक लागोपाठ १२२ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. रविवारी त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढत २५७ किलो वजनाच्या सहा बाईक लागोपाठ ३७७ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम केला आहे. खरं तर, १५० वेळा या बाईक पोटावरून जाण्याची तयारी पंडित धायगुडे यांनी केली होती. पण, त्रिशतक -होता-होता सहा बाईक तब्बल ३७७ वेळा त्यांच्या पोटावरून गेल्या. ३७७ व्या खेपेला इंडियाज स्कॉटची तब्बल ४५० किलो वजनाची गाडी धायगुडेंच्या अंगावरून गेली आणि एकच जल्लोष झाला. सुरुवातील धायगुडे यांनी एका मिनिटात १०५ साईड सीटअप्सचा देखील विश्वविक्रम केला. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, आयआरएस नितीन वाघमोडे, ठाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, राष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर, कस्टम ऑफिसर संदीप भोसले, ज्येष्ठ वकील नानासाहेब मोटे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबाजी पाटील, प्राध्यापक दत्ताजी डांगे, डॉ. मनोज माने, डॉ. अरुण गावडे, प्रशिक्षक गणेश मरगजे, मणी गौडा, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -