Monday, May 19, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

पवारांना जमले, ठाकरेंना जमले नाही : नारायण राणे यांचा टोला

पवारांना जमले, ठाकरेंना जमले नाही : नारायण राणे यांचा टोला

मुंबई (प्रतिनिधी): जे माननीय शरद पवार यांना जमले ते उबाठा सेनेच्या नेतृत्वाला का जमले नाही असा झणझणीत सवाल केंद्रीय सुक्ष्म,लघू व मध्यम उदयोग मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.


उबाठा सेनेच्या मुखपत्रातील प्रसिध्द झालेल्या 'भाजप लॉजिंग-बोर्डिग रिकामेच' या अग्रलेखाला संपादकीय म्हणता येणार नाही. संजय राउतांची भाषा राज्कीय व सामाजिकदृष्टया अत्यंत हिन दर्जाची असून पत्रकारितेची पावित्र्य राखणारी नाही. जो पवारांची सतत पाठराखण करतो व जो सतत पवारांच्या पाठीमागे फिरतो त्याने पवारांवर टीका करण्याची हिंम्मत कशी केली, असा परखड सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.


शिवसेनेच्या नेतृत्वावर (उबाठा सेना ) अविश्वास दाखवून एकनाथ शिंदे यांनी आव्हान देण्याचे धाडस केले व त्यांच्या बरोबर पक्षाचे ४० आमदार बाहेर पडले.तेव्हापासून त्यांची याच उबाठा सेनेच्या मुखपत्रातून गददार, खोकी, डुक्कर अशा गलिच्छ शब्दात संभावना केली गेली. आता मात्र त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे असे संजय राउत लिहितात. पत्रकार किंवा कोणीही व्यक्ती आमदारांविषयी अथवा मुख्यमंत्र्यांविषयी असे लिहू शकणार नाही. राउतांची वृत्ती गाढवासारखी आहे. हा जिथे जातो, ज्याचे खातो तिथे लाथ मारण्याचे काम करतो. कोणी काही जेवण दिले तरीही लाथ मारण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची भाषा ध्देषाची आहे आणि भाजपाविषयी त्यांचा कमालीचा आकस आहे, अशा शब्दात राउतांना झोडपून काढले आहे.


देशात ३०२ खासदारांचे भक्कम बहुमत घेवून भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. राज्यातही भाजप सत्तेवर असून शिंदे फडणवीस सरकारपाशी भक्कम बहुमत आहे. एकनाथ शिंदे हे स्वाभीमानी नेते असून, ४० आमदार त्यांच्या सोबत बाहेर पडले तेव्हा त्यांना थांबविण्याची क्षमता पक्षाच्या नेतृत्वात नाही, हे सर्व देशाने पाहिले. त्या ४० आमदारांना रोखण्यासाठी संजय राउत का मदतीला गेले नाहीत, असा प्रश्न राणे यांनी विचारला.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना शरद पवारांनी रोखले. पवारांना जमले ते ठाकरेंना का जमले नाही. आपण कोण आहोत आपली औकात काय याचे आत्म परिक्षण संजय राउत यांनी करावे. शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात उध्दव ठाकरे यांच्या विषयी काय लिहिले आहे ते वाचावे. याचा त्यांना अर्थ कळला नसेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही समजावून देवू, अशा शब्दात राणे यांनी राउतांची कानउघडणी केली आहे।


भाजप आणि भाजपच्या नेत्यांविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही. यापुढेही तुम्ही असेच लिखाण करत राहाल किंवा बोलत राहाल ते आम्हाला बंद करावे लागेल. लॉजिंग बोर्डीग तयारच आहे त्यात तुमची व्यवस्था केली जाईल असा खणखणीत इशार राणे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment