अधिकारीच नाही म्हणून सीईओच्या खुर्चीला हार
पुणे (प्रतिनिधी ): गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळाने (म्हाडा) सदनिकांच्या सोडतीसाठी नेमण्यात आलेल्या सॉफ्टवेअर कंपनीची प्रणाली सदोष असताना कुठलीही खातरजमा न करता या कंपनीला निविदा मान्य करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पुणे मंडळाच्या सोडतीत त्रुटींमुळे विजेत्यांना निकाल लागल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर देकरार पत्र वितरित करण्यात आले आहे.
याबाबत म्हाडाच्या वरिष्ठासोबत वारंवार चर्चा करूनही कुठलेच उत्तर न देता मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे अशी थातूरमातूर उत्तरे दिली जात आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी न्यायालयीन लढा देण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपनीकडून माध्यमांच्या कार्यालयात संपर्क करून बातम्या लावू नये अशा याचना केल्या जात आहेत.
तब्बल दोन महिन्यापासून पैसे भरून देकरार पत्र मिळाले नसल्याने सोमवारी विजेत्यानी म्हाडाच्या कार्यालयात गर्दी करत अधिकाऱ्यांना घेराव घातला. याबाबत प्रश्नांची उत्तरे देण्याचा अधिकार माझ्या हातात नाही असे सांगत अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला येवले, रोहन सुरवसे पाटील, संतोष साठे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांच्या कार्यालयात जाऊन रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला आहे.
पुणे मंडळाचे मुख्याधिकरी माने पाटील यांच्या बदलीचे आदेश मागील आठवड्यात प्रसूत झाले असून त्यांच्या जागी अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अद्याप माने पाटील यांनी पदाचा कार्यभार सोडला नसला, तरी मागील आठवडाभरापासून ते कार्यालयात देखील हजर नाही. तसेच काही अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या केल्या आहेत. विजेत्यांना अद्यापही प्रतिक्षाच करावी लागत असून खासगी सोफ्टवेअर कंपनीवाले मश्गूल आहेत. त्यामुळे पुणे विभागीय म्हाडाच्या कार्यालयाला नक्की वाली कोण असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.