मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार ही प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत येत्या मंगळवारपासून सुरू होणार आहे. पीसीएम ग्रुप दि.९ ते १४ मे आणि पीसीबी ग्रुप १५ ते २० मे या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
एमएचटी सीईटी २०२३ (पीसीएम ग्रुप)चे प्रवेश पत्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.उमेदवारांनी प्रवेश पत्र अभ्यासक्रमाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढावी. प्रवेश पत्रावरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. परीक्षेस जाताना प्रवेश पत्र सोबत घेऊन जावे. परीक्षेस जाताना उमेदवाराने त्याचबरोबर आपली ओळख दर्शविणारे ओळखपत्र जसे की, पॅन कार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट इत्यादी सोबत ठेवावेत. दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्वाबाबतचे मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. यासह एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप)चे प्रवेश पत्र उमेदवारांना १० मे, २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येईल.