Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीज्यांनी अध्यक्षपदासाठी ‘रयत’ची घटना बदलली ते पक्षाध्यक्षपद कसे सोडतील

ज्यांनी अध्यक्षपदासाठी ‘रयत’ची घटना बदलली ते पक्षाध्यक्षपद कसे सोडतील

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा शरद पवारांना टोला

पुणे (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या दबावापुढे माघार घेत पवारांनी आपला निर्णय मागे घेतला आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘ज्या शरद पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी तिथली घटना बदलली ते स्वतः उभा केलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कसा देतील’, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे.

‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून शरद पवार अध्यक्ष होऊ शकतात, फक्त रयतच नाही तर अशा अनेक शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था आहेत ज्यांची घटना बदलून शरद पवार हे अध्यक्ष झाले आहेत. मग अशावेळी ५० वर्षे ज्यांनी आपले आयुष्य राजकारणात घातले ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला ते कसे काय दुसऱ्याला अध्यक्ष होऊ देतील. शरद पवार हे दुसऱ्या कोणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ देणार नाहीत’, अशी जोरदार टीका बावनकुळे यांनी केली आहे.

दुसऱ्यांनी उभे केलेले सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था यांचे अध्यक्ष होण्यासाठी ज्या लोकांनी घटना बदलली ते स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्याला कसे होऊ देतील? रयत हे फक्त एक उदाहरण आहे. अशी ५० नावे आपल्याला सांगता येतील. यावर एक पुस्तक लिहिता येईल’, असे देखील बावनकुळे पुढे म्हणाले.

राष्ट्रवादीचा ‘तो’खेळ म्हणजे घरगुती तमाशा…

‘राष्ट्रवादी काँग्रेसचा जो तीन दिवसांचा खेळ सुरू होता, महाराष्ट्रात जी नौटंकी झाली, ती म्हणजे घरगुती तमाशातील वगनाट्य होते. त्यामुळे ही सगळी लिखित स्क्रिप्ट होती हे माहीतच होतं. राष्ट्रवादीला प्रसिद्धीच्या झोतात राहायचे होते म्हणून त्यांनी ही नौटंकी केली’, असा घणाघात बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीनामा नाट्यावर केला आहे.

आमच्याकडे १८४ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात १६ आमदारांच्या निलंबनावर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘उद्या जर विधानमंडळात बहुमत सिद्ध करायला सांगितले तर माझा दावा आहे १८४ पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ऑक्टोबर २०२४ पर्यंत आमचे सरकार टिकेल आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -