Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाIPL 2024गुजरातचा विजयी चौकार; प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित

गुजरातचा विजयी चौकार; प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित

लखनऊवर ५६ धावांनी मात

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने रविवारी लखनऊचा ५६ धावांनी पराभव केला आणि गतविजेत्या गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले. गुजरातने ११ सामन्यांत आठ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या बंधुंमधील ही लढत एकतर्फी झाली. २२८ धावांचा बचाव करताना गुजरातने लखनऊला १७१ धावांत रोखले. मोहित शर्मा याने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले. साहा आणि गिल यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहित शर्मा याने भेदक मारा केला. गुजरातने लखनऊला आयपीएलमध्ये चौथ्यांदा पराभूत केले. गुजरातविरोधात लखनऊला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.

गुजरातने दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली. काइल मेयर्स आणि क्विंटन डिकॉक यांनी ८८ धावांची सलामी दिली. या जोडीने पाॅवरप्लेमध्ये ७२ धावांचा पाऊस पाडला होता. मोहित शर्माने ही जोडी फोडत लखनऊला मोठा धक्का दिला. मोहितने ४८ धावांवर काइल मेयर्स याला बाद केले. या विकेटनंतर लखनऊचा डाव गडगडला. काइल मेयर्सने ३२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. त्यामध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले आहेत, तर क्विंटन डिकॉक याने ७० धावांची खेळी केली. या खेळीत क्विंटन डिकॉक याने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ७० धावांचा पाऊस पाडला.

क्विटन डिकॉक आणि काइल मेयर्स यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. एकही फलंदाजाला ३० धावा करता आल्या नाहीत. दीपक हुड्डा ११, मार्कस स्टॉयनिस ४, निकोल पूरन ३, आयुष बडोनी २१ धावांवर बाद झाले.

साहा-गिल यांची वादळी खेळी…

वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित २० षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २२७ धावांपर्यंत मजल मारली. गिल आणि साहा यांनी १४२ धावांची सलामी दिली. गुजरातकडूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी होय. साहा आणि गिल जोडीने गुजरातला वादळी सुरुवात करुन दिली. विशेषत: साहाने लखनऊच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. साहाने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. साहा फटकेबाजी करत असताना गिलने त्याला चांगली साथ दिली. साहा आणि गिल जोडीने १२ षटकात १४२ धावांची सलामी दिली. साहाने मौदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. साहा याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले. गुजरातने पावरप्लेमध्ये ७८ धावांचा पाऊस पाडला होता. साहाने ४३ चेंडूत वादळी ८१ धावांची खेळी केली. या खेळीत साहाने चार षटकार आणि दहा चौकार लगावले. साहा आणि गिल यांनी लखनऊच्य प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. शुभमन गिल याने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. चौकारांपेक्षा षटकार जास्त लावत गिल याने धावांचा पाऊस पाडला. शुभमन गिल याला कर्णधार हार्दिक पांड्याने चांगली साथ दिली. पांड्याने १५ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह २५ धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी दूसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ४२ धावा चोपल्या. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने मिलरच्या साथीने गुजरातच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात षटकार आणि दोन चौकार लगावले. गिल आणि मिलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूत ४३ धावांची भागिदारी केली. डेविड मिलर याने १२ चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -