Friday, May 9, 2025

क्रीडाIPL 2025

गुजरात-चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित

गुजरात-चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित

मुंबई (प्रतिनिधी) : ‘आयपीएल’चा संग्राम आता उत्तरार्धाकडे झुकला आहे. प्रत्येक सामना रंगतदार होत आहे. दहाही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे व प्रत्येक संघ प्लेऑफची तयारीही करत आहे. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. गुजरात संघाची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ९१ टक्के आहे.तर चेन्नईची शक्यता ७८ टक्के आहे.



तर कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सर्वात कमी आहे. दिल्लीची शक्यता ११ टक्के इतकी आहे. तर हैदराबादची शक्यता फक्त चार टक्के आहे. कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता १२ टक्के इतकी आहे. दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबीची प्लेऑफमध्ये पोहचणे खडतर झाले आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता फक्त ३४ टक्के इतकी आहे. तर मुंबईची शक्यता ३६ टक्के आहे.



सध्या प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आघाडीवर आहेत. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या गुणतालिकेत टॉप-४ मध्ये गुजरात टायटन्स संघासह चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा समावेश आहे. इतर संघांची परिस्थिती पाहिली तर राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघाकडे १०-१० गुण आहेत.


प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या संघाला किती संधी?
गुजरात : ९१ %
चेन्नई : ७८%
लखनौ : ५८%
राजस्थान : ४२%
मुंबई : ३६%
बेंगलोर : ३४%
पंजाब : ३१%
कोलकाता : १२%
दिल्ली : ११%
हैदराबाद : ४%

Comments
Add Comment