महाविकासआघाडीमधील वाद चव्हाट्यावर
सोलापूर: एका बाजूला सर्व आलबेल असल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये खरच सर्व आलबेल आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकीकडे महाविकास आघाडी मजबूत असल्याचे सांगताना शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करत मोठी मागणी केली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेले आमचे उमेदवार परत करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. महाडमधील स्नेहल जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचे अनेक नेत्यांना पक्षात घेणे सुरु केले आहे. आघाडीसाठी हे योग्य नसल्याची भूमिका मांडत नाना पटोले यांनी आमचे घेतलेले उमेदवार या पक्षांनी परत करावेत अशी मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत करणार असल्याचे सांगितले. आज राष्ट्रवादीचे नाराज भगीरथ भालके यांची नाना पटोले यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाली. याबाबत छेडले असता भालके यांच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ दिले जाणार नसून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ वाटपाबाबत नाना पटोले यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पूर्वी ज्या पद्धतीने जागा वाटप झाले त्यामुळे पराभूत व्हावे लागले. आता यावर पुन्हा विचार करावा लागेल असे पटोले यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे. गेल्या जागा वाटपाच्यावेळी शिवसेना हा आघाडीत नसल्याने आता आघाडीतील जागांची संख्या देखील कमी होणार आहे. पटोले यांनी केलेले वक्तव्य महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फोडणार आहे.