तलासरी : वाहन चालकाने वाहतुकीचे नियम तोडल्यास त्यास दंडात्मक कारवाई केली जाते, वाहनचालक पळून गेल्यास त्याचा नंबर घेऊन त्याला दंडाचे चलन पाठविले जाते, पण या वाहतूक पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे नियम तोडून पळून गेलेल्या वाहन चालकाचे दंडाचे चलन दुसऱ्याच वाहन चालकाला पाठविले जात असल्याने वाहतूक पोलिसांचा अजब कारभार उघड होऊ लागल्याने वाहनचालक त्रस्त असून, त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.
रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या महामार्ग ट्रॅफिक पोलीस हे रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्याऐवजी वाहन चालकांची कशी लूट व पिळवणूक करतात हे सर्वसामान्य जनता बघत असताना, आता त्याचा बेजबाबदारपणाचा फटका निर्दोष वाहन चालकांना बसू लागला आहे.
एक मोटारसायकल चालक विनाहेल्मेट पोलिसांच्या नियमांचा भंग करून पळून गेला, पण यावेळी कर्तव्य बजावित असलेल्या अधिकारी पोलीस कर्मचाऱ्याने त्या गाडीचा फोटो काढून चलन पाठविले, परंतु चलन पाठवितांना त्या जबाबदार कर्मचाऱ्याने रुपये १२५० चे चलन कारला पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडविले.
तसेच तलासरीमधील पत्रकार सुरेश काटे यांच्या कीया करेन्स कारला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांचे चलन क्रमांक दि. ११ फेब्रुवारी २०२३ चे अधिकारी बबन नांदुरकर यांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणेबाबत रुपये ७५०, तसेच इतर दोन वाहनचालकांनी विनाहेल्मेट गाडी चालविलेबाबत रुपये ५०० असे एकूण १२५० रुपयाचे चलन आल्याने याबाबत संशय आल्याने ईव्हिडन्स पाहिले असता, फोटो हे दुसऱ्यांच्या मोटारसायकल असल्याचे आढळून आले़ याबाबत ऑनलाइन तक्रार टाकण्यात येणार असली, तरी ट्रॅफिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा मात्र मन:स्ताप झाला आहे.