Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकाँग्रेसचा स्वतःवरच केलेला गोल

काँग्रेसचा स्वतःवरच केलेला गोल

काँग्रेस पूर्वी केलेल्या चुकांपासून शहाणपणा शिकत तर नाहीच, पण नव्या चुका करून भाजपला एकाहून एक मुद्दे स्वतःहून देत असते, हे कित्येकदा दिसले आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात सामील करून काँग्रेसने स्वतःवरच गोल केला आहे. कारण या मुद्द्यावर कर्नाटकात राजकारण रंगले आहे आणि भाजपने बजरंग बलीची घोषणा देत बजरंग दलावर बंदी घालण्याचा प्रमुख मुद्दा बनवला आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस बॅकफूटवर ढकलली गेली आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याचा विचार नाही, असे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी खरगे यांचे कान उपटल्याचे सांगण्यात येते. त्यांना अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी बजरंग दलावर बंदीचा मुद्दा हवा होता. पण खरगे यांनीच बंदीचा मुद्दा निकालात काढल्यावर काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि खरगे यांच्यात ताणतणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. अर्थात याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मुद्द्याभोवती कर्नाटकात राजकारण फिरते आहेच, पण धार्मिक ध्रुवीकरणाची इतकी सोनेरी संधी काँग्रेसने आपण होऊन भाजपच्या हातात दिली आहे. आता याचा फायदा भाजपसारखा कसलेला पक्ष उठवणार नाही तर काय गप्प बसेल? भाजपने हा निवडणुकीचा मुद्दा बनवलाच पण खुद्द पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील प्रचारसभांमध्ये जय बजरंग बली अशी घोषणा देऊन भाजप धार्मिक ध्रुवीकरणासारखा सोनेरी अवसर हातातून जाऊ द्यायचा नाही, याचे संकेत पक्षाला दिले. कर्नाटकात नंदिनी ब्रँडचे दूध आणि बजरंग दल या मुद्द्यांवर भाजपने काँग्रेसवर प्रचारातच मात केली आहे. अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनात किती हीन पातळी काँग्रेस गाठू शकते, याचे प्रत्यंतर बजरंग दलावरील बंदीचा जाहीरनाम्यात उल्लेख करून आणून दिले. काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे, असे म्हणून अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाची काँग्रेसने खालची पातळी आता गाठली आहे. काँग्रेस हिंदूविरोधी आहेच आणि तसे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

हिंदू बॅकलॅशचा फटका काँग्रेसला गेले कित्येक वर्षे बसत आहे. इतकी वर्षे काँग्रेसला जोरदार पर्याय नव्हता म्हणून सारे दिसत असूनही लोक काँग्रेसला मतदान करत असत. पण आता मोदी, अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांच्यासारखा जोरदार पर्याय असताना काँग्रेसच्या अल्पसंख्याक लांगूलचालनाला मतदारांनी धुडकावून लावले, यात काहीच नवल नव्हते. आता तरी काँग्रेसने जुनीच चावून चोथा झालेली पोपटपंची सोडावी आणि देशाला नवीन काही तरी द्यावे, अशी ग्रँड ओल्ड पार्टीकडून काहीतरी अपेक्षा करणे चुकीचे नाही. पण काँग्रेसचे शीर्षस्थ नेतृत्व त्याच जुन्या धोरणचकव्यात अडकले आहे. काँग्रेसचे कर्नाटकातील स्थानिक नेते डॅमेज कंट्रोलच्या प्रयोगाला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर जे नुकतेच काँग्रेसमध्ये आले आहेत, त्यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याचा काहीच विचार नाही, असे जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पण हिंदू बॅकलॅशचा फटका खाण्याची भीती ज्या काँग्रेसला आहे, त्याच काँग्रेसनेच स्वतःच असे मुद्दे भाजपसारख्या पक्षाला देणे हे नेहमीचेच आहे. भाजप हा विकासवादी पक्ष आहे. पण तो त्याचबरोबर हिंदुत्वहित पाहणाराही आहे. त्यामुळे त्या पक्षाचा विकास आणि हिंदू हित असा जबरदस्त संयोग हा लोकांना भावणारा अजेंडा आहे. कर्नाटक हे राज्य महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. महाराष्ट्र हा हनुमान भक्त आहे कारण समर्थ रामदासांनी महाराष्ट्रातच ११ हनुमंतांची देवालये स्थापन केली होती. तसेच बलोपासना करण्याचा मंत्रही रामदासांनी दिला होता. त्यावेळी महाराष्ट्रात मुघलांचे अत्याचार सुरू होते. त्यावेळी रामदासांनी बलोपासनेचे महत्त्व सांगितले. याचा संदर्भ कर्नाटकातील आजच्या राजकारणाला आहे. अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी काँग्रेस मुद्दाम बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा आणत असेल, तर निश्चितच हिंदू खवळून उठणार आणि काँग्रेसला निवडणुकीच चीत करणार, हे कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांना समजते आहे.

दिल्लीत बसून काँग्रेसच्या हायकमांडला ते समजणे शक्य नाही. म्हणूनच काँग्रेसचे स्थानिक नेते दिल्लीतील नेत्यांविरोधात मनातून शिव्या घालत असावेत. पण त्यांना उघड बोलता येत नाही. बजरंग दल ही काही पीएफआयसारखी देशद्रोही संघटना नाही. पण तिला पीएफआयच्या बरोबरीने बसवून काँग्रेसने हिंदूंचा जो अपमान केला आहे, त्याची शिक्षा काँग्रेसला या निवडणुकीत मिळणार, हे उघड आहे. म्हणूनच राज्यातील काँग्रेस नेते चांगलेच अस्वस्थ आहेत. काँग्रेसचा रामावर विश्वास नाही, रामसेतू अस्तित्वातच नाही, असा दावा न्यायालयात काँग्रेसने केला होता, असा आरोप भाजप सातत्याने लावत आला आहे आणि त्यात तथ्य आहे. इस्लामी दहशतवादाने देशात निरपराध हिंदू आणि मुस्लीमांचेही बळी घेतले असताना काँग्रेसचे पी. चिदंबरम यांनी भगवा हिंदुत्ववाद असा नवाच आणि अस्तित्वात नसलेला शब्द काढून हिंदूंना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले होते. त्याची शिक्षा म्हणून काँग्रेस आज सत्तेबाहेर तर आहेच पण अत्यंत वाईट तर्हेने त्याचा पराभव झाला आहे. पण त्यातून काँग्रेस शिकली नाही, हेच सत्य पुन्हा बाहेर आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -