
अन्य डॉक्टर करतात रुग्णांची तपासणी
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणी बाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर येथील रुग्णालयात फिजिशियन डॉक्टरच गेल्या कित्येक महिन्यांपासून उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली असून फिजिशियन तज्ज्ञ डॉक्टरच येथे नसल्याने अन्य डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करावी लागत आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाई रुक्मिणी बाई रुग्णालय कल्याण,व शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली येथे अशी दोन प्रशस्त रुग्णालये उभारण्यात आली आहेत. रुग्णांना सर्व व्याधींवर उपचार मिळावेत म्हणून फिजिशियन डॉक्टरांची अत्यंत गरज असते. मात्र मुख्य उपचारांवर तपासणी करणाऱ्या फिजिशियन डॉक्टरांची जागा या रुग्णालयांत रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. फिजिशियन मुख्यतः मेडिसिनचे रुग्ण तपासण्याचे काम करतात. मधुमेह तपासणी रुग्ण, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची तपासणी फिजिशियन डॉक्टर करीत असतात. मात्र या दोन्ही रुग्णालयात फिजिशियन डॉक्टरच नसल्याने रुग्णांची पंचायइर होत आहे.
फिजिशियन डॉक्टरला ८० ते ८५ हजार प्रति महिना या त्यांच्या दृष्टीने कमी वेतनावर ठेवले जात असल्याने कोणीही फिजिशियन रुग्णालयात काम करण्यासाठी तयार होत नाही, असे समजते.अशा डॉक्टरांना खासगी रुग्णालयात भरपूर पैसे मिळतात. महापालिकेचे रुग्णालय असल्याने दोन्ही रुग्णालयात सकाळच्या सत्रात रुग्णांची मोठी गर्दी असते. मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या त्रस्त रुग्णांवर योग्य तो उपचार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार मिळत नसल्याने त्यांना ठाणे, मुंबईतील रुग्णालयात जावे लागते.
याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता दोन्ही रुग्णालयात कायमस्वरूपी फिजिशियन नसल्याचे सांगत पार्ट टाईम म्हणून शास्त्रीनगर येथे तर बाई रुक्मिणी रुग्णालयात क्षयरोग्यांकरिता चेस्ट फिजिशियन असल्याचे त्यांनी सांगितले. या फिजिशियनकडे क्षयरोगांचा विभाग दिला असल्याचे त्यांनी सांगितले. शास्त्रीनगर रुग्णालयात केवळ दोन ते तीन तासासाठी फिजिशियन डॉक्टर येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.