Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीमणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत

मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत

महाराष्ट्रात आणण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई (प्रतिनिधी ): मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल चर्चा केली होती. त्यानंतर आज सकाळी या विद्यार्थ्यांना मणिपूर इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर आज रात्री विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी,आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. याचबरोबरच मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने आसाममार्गे महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आज हे विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

सुखरूप परत आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : आदित्य गजभिये, तुषार आव्हाड, आयुष दुबे, शिवसंपत तागिरीसा, गौतम चौरसिया, साजन पौणिकर, मोहित खडपे, भूषण पावरा, वृक्षाल गणवीर, विकास शर्मा, तन्मय मादव, मडिकोंडा अविनाश, रोहित कोरी, आयुष रवी, ज्ञानदीप छुटे, प्रतिक कोडग, पुनर्वसू इंगोले, साईजित निकम, अनन्य बॅनर्जी, शंतनू कुंभीरकर, क्रिश कलगुडे, फाल्गुन महाजन, मधुरिका इंदूरकर, रोनिल नाडर आणि अश्वगंधा पराडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -