नवी दिल्ली (प्रतिनिधी) : २६ जानेवारी २०२४ रोजी कर्तव्य पथवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केवळ महिलांचा समावेश असणार आहे. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने सैन्यदल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या काही वर्षांत, केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. याचा उद्देश महिलांना जबाबदारी देणे आणि भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांना तयार करणे हा आहे. गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.