खेड (प्रतिनिधी) : कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी सेंट्रल रेल्वेने आणखी दोन अनारक्षित साप्ताहिक उन्हाळी स्पेशल जाहीर केल्या. पुणे-रत्नागिरीसह रत्नागिरी-पनवेल अनारक्षित स्पेशल गाड्यांचा समावेश आहे. या स्पेशल गाड्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी गर्दीची तीव्रता कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
०११३३ /०११३४ क्रमांकाची रत्नागिरी-पनवेल अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी ५, १२, १९, २६ मे रोजी धावेल. रत्नागिरी येथून दुपारी १ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ८.२० वाजता पनवेल येथे पोहचेल.
परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता रत्नागिरीला पोहचेल. २२ डब्यांची स्पेशल संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगांव, रोहा स्थानकात थांबेल.
०११३१/०११३२ क्रमांकाची पुणे – रत्नागिरी अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावेल. ११, १८, २५ मे रोजी धावणारी स्पेशल पुणे येथून रात्री ८.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल.
परतीच्या प्रवासात दर शनिवारी ६, १३, २०, २७ मे रोजी धावणारी स्पेशल रत्नागिरी येथून दुपारी १ वा. सुटून त्याचदिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहचेल. २२ डब्यांची स्पेशल लोणावळा, कल्याण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर आदी स्थानकात थांबेल.
अजमेर-एर्नाकुलम कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने अजमेर-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेस डिझेलऐवजी विजेवर चालविण्याचे नियोजन केले आहे.