Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीयेत्या काही दिवसांत संजय राऊत शिवसेना सोडणार आणि 'या' पक्षात प्रवेश करणार

येत्या काही दिवसांत संजय राऊत शिवसेना सोडणार आणि ‘या’ पक्षात प्रवेश करणार

नितेश राणे यांनी केली संजय राऊत यांची भांडाफोड

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याचे विधान नितेश राणे यांनी केले आहे. संजय राऊत कोणत्या पक्षात कधी जाणार याची खळबळजनक माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय संजय राऊत शिवसेना का सोडणार आहेत? याचं कारणेही नितेश यांनी दिली आहेत. नितेश राणेंनी दिलेली माहिती ही एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना सावधानतेचा दिलेला इशाराच समजला जात आहे.

नितेश राणे म्हणाले, येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार आहे. १० जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या बैठका झाल्या आहेत. बोलणी झाली आहे. मला ही माहिती सूत्रांनी दिली. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिका पाहिल्यास त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

संजय राऊत सातत्याने अजितदादांवर टीका करत आले आहेत. अजितदादांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो, अशी अटच त्यांनी घातली आहे. त्यामुळे ते सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. टीका करत आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला तेव्हा संजय राऊत यांना शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर बसायचं होतं. त्यासाठी ते शरद पवारांना सकाळपासून फोन करत होते. संपर्क झाला नाही म्हणून संध्याकाळी ४ वाजता ते सिल्वर ओकवर गेले. तसंच आता उद्धव ठाकरे यांचं काही खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात आता काही अर्थ राहिला नाही. त्यामुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत हा साप

नितेश राणे यांनी राऊतांवर जळजळीत टीका करत त्यांना साप म्हटले आहे. ते म्हणाले, राऊत यांना शरद पवारांच्या व्यासपीठावर बसायचं होतं. राजीम्याच्या वेळी राऊत सकाळपासून पवारांच्या संपर्कात होते. पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे राऊत दुपारी ४ वाजता सिल्व्हर ओकला गेले. संजय राऊत साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत होता. तो बाळासाहेबांचा झाला नाही. तो तुमचा होऊच शकणार नाही, या शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या मनसुब्यांची भांडाफोड केली. ते म्हणाले, हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय. राऊतांनी ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली. आता राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंना चित्र स्पष्ट होईल. एका माणसामुळे पक्ष फुटला हे त्यांना कळेल, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र पेटवायला निघालेल्यांनो तुम्ही साधं कलागनर बंद करून दाखवा….

उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकरणी महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा केली होती. त्याला नितेश राणे यांनी जबरदस्त उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्र बंद करुन दाखवा, अहो महाराष्ट्र सोडा साधी मुंबई बंद करून दाखवा. मुंबई जमत नसेल तर कलानगर तरी बंद करून दाखवा, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -