Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीअवकाळीमुळे ऐन उन्हाळ्यात गारवा

अवकाळीमुळे ऐन उन्हाळ्यात गारवा

मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता; हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी चिंता

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यंदा हिवाळ्यात महाराष्ट्रभरात विशेष थंडी जाणवली नाही. थंडी कधी आली आणि गेली हेच समजले नाही. आता ऐन उन्हाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका मान्सूनवर होऊ शकतो, अशी भीतीही हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामानातील या बदलामुळे भारतात मान्सून लांबण्याची शक्यता आहे. साधारणतः भारतात मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो. तो आता काही काळ विलंबाने येण्याची शक्यता दिसत आहे.

ऐन उन्हाळ्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचे तापमान हे घसरले आहे. पावसामुळे महाराष्ट्रात महाबळेश्वरसह विदर्भात काही ठिकाणी आणि देशाची राजधानी दिल्लीसह काही भागांमध्ये दाट धुके पसरले होते. ऐन उन्हाळ्यात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आता हवामानतज्ज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. थंड उन्हाळ्यामुळे किंवा सततच्या अवकाळी पावसामुळे तापमान घसरल्याने मान्सूनवर त्याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्याचे उभे पीक वाहून गेले आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अवकाळीचे हे संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी पाहत असताना, दुसरीकडे ही एक चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे.

तापमानाचे प्रवण झाले कमी
भारताचा बहुतांश भूभाग उन्हाळ्यात तापण्याऐवजी थंड होण्याचा कल असेल. म्हणजेच यंदा जे होत आहे, त्यानुसार जमीन आणि समुद्र यांच्यातील तापमानाचे प्रवण कमी झाले आहे आणि हवामानातील या बदलामुळे भारतात मान्सून लांबण्याची शक्यता आहे. साधारणतः भारतात मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो. भारतात मार्च ते मे हा मान्सूनपूर्व कालावधी आहे. हा काळ नैऋत्य मोसमी पावसाच्या निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो’, असे माजी सचिव डॉ. एम. राजीवन यांनी म्हटले आहे.

मान्सूनबाबत भारतीय हवामानशास्त्राचा अंदाज
काही दिवसांपूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला होता. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार. यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली होती. जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव राहणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मे महिना सुरू झाली तरी राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक भागांत झालेल्या गारपिटीने बळीराजा त्रस्त आहे. अवकाळीचे हे संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी पाहत असून त्यातच मान्सून लांबणीवर पडू शकतो, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -