Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणकिल्ले रायगड संवर्धनाचे काम संथगतीने सुरू

किल्ले रायगड संवर्धनाचे काम संथगतीने सुरू

पुरातत्त्व विभागाकडे साडेआठ कोटींचा निधी पडून

अलिबाग (प्रतिनिधी) : किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असला तरी, भारतीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ला जतन व संवर्धनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. १९ पैकी केवळ २ कामेच विभागाने पूर्ण केली असून असून, साडेआठ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.

हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनासाठी राज्यसरकारने साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धना बरोबरच या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना राज्यसरकारने केली आहे. रायगडसाठी बांधकाम विभागाचे विशेष स्थापत्य पथक नेमण्यात आले आहे. जेणेकरून किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. पण तरीही गड जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामांना गती मिळू शकलेली नाही.

कार्यकारी अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड यांच्या माध्यमातून २०१६ ते २०२३ पर्यंत एकूण १११ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे सध्या सुरू आहेत. २३ कामांना अद्याप सुरुवातही होऊ शकलेली नाही. किल्ला संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व विभागामार्फत केले जात आहे. यासाठी त्यांना ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गड संवर्धनाच्या १९ कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी केवळ दोन कामे पूर्ण झाली असून, १२ कामे प्रगतिपथावर आहेत. ४ कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.

किल्ले रायगडावर यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. २ जून ते सहा जून दरम्यान तिथी आणि तारखेनुसार या सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वी गडसंवर्धनाची कामे नेटाने गती देऊन पूर्ण करणे गरजेचे असणार आहे.

“किल्ला जतन करण्याची कामे हे कौशल्यपूर्ण होणे अपेक्षित आहे. गडाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता ही कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागाची अखत्यारीत असलेल्या कामे घाईगडबडीत होऊ शकत नाहीत. त्याला योग्य वेळ द्यावा लागेल. पण जास्त मनुष्यबळ लावून कामाची गती वाढवा, यासाठी पाठपुरावा करता येईल”.
– रघुजीराजे आंग्रे, सदस्य रायगड प्राधिकरण.

“गडावरील संवर्धनाची कामे संथगतीने सुरू असून कामांचा वेग वाढवायला हवा. गडावर झालेल्या उत्खननात काय सापडले याचे अहवाल पुरातत्त्व विभागाने प्रसिद्ध करायला हवेत. ज्या अहवालांचा फायदा इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना होऊ शकेल. गडसंवर्धनाच्या कामाचा वेग वाढायला हवा”.
– डॉ. अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -