-
ऐकलंत का! : दीपक परब
सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. याच चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा द रुल’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ‘पुष्पा २’ या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी विकले गेले आहेत. ‘पुष्पा २’चे ऑडिओ राइट्स ६५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ आणि ‘R R R’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ऑडिओ राइट्स सुमारे १० कोटी ते २५ कोटींमध्ये विकले गेले होते. त्यामुळे आता या दोन्ही चित्रपटांचे ऑडिओ राइट्स प्राइजचे रेकॉर्ड ‘पुष्पा २’ या चित्रपटाने तोडले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २’ या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. दोघांच्याही लूकला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाली. फोटोमध्ये अल्लू अर्जुनच्या गळ्यात लिंबाची माळ दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये त्याने भरजरी साडी देखील नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी अशा अल्लू अर्जुनच्या लूकने त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील श्रीवल्ली, सामी सामी, ओ अंटवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘मैं झुकेगा नहीं साला’, ‘फ्लावर नहीं फायर है’ या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सने तर प्रेक्षकांना वेड लावले. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.