मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पारबंदर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे गाठला असून प्रकल्पाच्या ६९व्या ‘ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक’ची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे.
मुंबई-नवी मुंबई प्रवास सुकर आणि वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पातील एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकपैकी ६९व्या, तर टप्पा २ मधील शेवटच्या ‘ओएसडी’ची शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यशस्वीपणे उभारणी केली. दरम्यान शेवटच्या ७०व्या ‘ओएसडी’ची उभारणी १२ मे रोजी करण्यात येणार असून ‘ओएसडी’चे काम पूर्ण होणार आहे. हे सर्व ७० ‘ओएसडी’ बसविण्याचे आव्हानात्मक काम एमएमआरडीएने केवळ १६ महिन्यांत पूर्ण केले आहे.
सागरी सेतू अत्यंत मजबूत करण्यासाठी, तसेच काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी एमएमआरडीएने प्रकल्पात अत्याधुनिक अशा ‘ऑर्थोट्रोपिक स्टील डेक’ परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात मुंबई पारबंदर प्रकल्पात वापर केला आहे. टप्पा २ मध्ये ३ जानेवारी २०२२ रोजी पहिला ‘ओएसडी’ बसविण्यात आला, तर शुक्रवारी प्रकल्पातील ६९व्या ‘ओएसडी’ची यशस्वी उभारणी करण्यात आली.
आतापर्यंत प्रकल्पाचे अंदाजे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण करून हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.