-
दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
सध्या पूर्वी आयपीएल सामन्यांचे मराठीतून निवेदन करत आहे. हे एक वेगळंच आव्हान असल्याचं ती मानते. नृत्यातील काही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार तिला मिळाले आहेत.
सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणा यांचा मेळ म्हणजे दुर्मीळ योग मानला जातो. पण शिवाजी पार्कातल्या तिला भेटलो की, आपण त्या दुर्मीळ योगाला भेटल्याची प्रचिती येते. सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्त्व, सोबत बुद्धिमत्तेची जोड. डोळे उघडून नीट पाहिलं की कळतं, “अरेच्चा, हिला तर घे भरारीमध्ये पाहिलं होतं…” अशी ही प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री म्हणजे पूर्वी भावे.
पूर्वीचा जन्म दादरच्या शिवाजी पार्कातलं. तिचे बाबा केमिकल इंजिनीअर, तर आई शास्त्रीय संगीत गायिका. घरातच कलेसाठी पोषक वातावरण होतं. त्यामुळे पूर्वीने शालेय जीवनापासूनच नाटकात काम करायला सुरुवात केली. शालेय कार्यक्रमांचं निवेदन करू लागली. भरतनाट्यम् नृत्याचे धडे देखील घेऊ लागली. हे सगळं अभ्यास सांभाळून करू लागली. दादरच्याच बालमोहन विद्यामंदिरात तिचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर आर. ए. पोदार कॉलेजमध्ये तिने पदवी प्राप्त केली. भरतनाट्यम् मध्ये तिने मास्टर्स ऑफ फाइन आर्ट्सची पदवी मिळवली. नाटक, नृत्य, गायन आणि निवेदन या सगळ्या प्रांतात तिने मुशाफिरी केली.
काही वर्षांपूर्वी तिचा छोटासा अपघात झाला होता. अपघातानंतर विश्रांती घेत असताना तिला एबीपी माझा वृत्तवाहिनीकडून ऑडिशनकरता बोलावणं आलं. मुळात पत्रकार नसल्याने काहीशा नाखुशीनेच तिने टेस्ट दिली. विशेष म्हणजे निवड झाल्याचा तिला फोन आला. हे काहीतरी बुद्धीला चालना देणारं, सर्जनशीलतेला वाव देणार आहे तसंच व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणारं आहे, हे तिच्या लक्षात आलं. पूर्वीने लगेच ती संधी स्वीकारली. या ठिकाणी तिच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडू लागले. कारणदेखील तसंच होतं. सोबतचे सगळे सहकारी पत्रकारितेतले दादा व्यक्तिमत्त्व असणारे होते. आणि निवेदिका म्हणून दिग्गजांची मुलाखत घ्यायला मिळाली ते तर बोनसच होतं. प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, रितेश देशमुख, अतुल कुलकर्णी, प्रख्यात क्रिकेट निवेदक हर्ष भोगले अशा साऱ्या रथी-महारथींच्या मुलाखती घेण्याची संधी पूर्वीला मिळाली. ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या सोबत तिने लाइव्ह शोदेखील केला होता. इतकंच नाही तर त्यावेळचा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि आताचा हॉलिवूड स्टार डेव्ह बॉटिस्टा याचीदेखील तिने मुलाखत घेतली. या दोन वर्षांत तिला सर्वोत्कृष्ट निवेदिकेसाठी नामांकन मिळाले होते.
पुढे एबीपी माझामधील नोकरी सोडून तिने निवेदिका आणि अभिनेत्री म्हणून आपलं स्थान बनवायला सुरुवात केली. या काळात एबीपी माझाने तिचा “घे भरारी” हा खास शो सुरू केला. या कार्यक्रमामुळे निवेदिका म्हणून तिचा चेहरा घरोघरी पोहोचला. यानंतर तिने ‘जल्लोष सुवणर्युगाचा’ हा रिअॅलिटी शो, ‘मेजवानी परिपूर्ण किचन’, ‘आकाशवाणी-झकासवाणी’, ‘स्वीट होम’, ‘गुणगुण गाणी’ असे अनेक कायर्क्रम तिने दूरदर्शनवर निवेदिका म्हणून केले. तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम, कॉर्पोरेट इव्हेंट्स, पुरस्कार सोहळा, चित्रपट महोत्सव यासाठी निवेदन केले. या दरम्यान ए. आर. रेहमान, रोहित शेट्टी, आशा भोसले, शंकर महादेवन, अमित त्रिवेदी, सचिन पिळगावकर, सुमित राघवन, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली आहे. शिवाय धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिची मुलाखत घेण्याचा मानसुद्धा तिला मिळाला. याचवेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणूनही तिचा प्रवास सुरू झाला होता. प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर पूर्वीने काही नाटकांमध्ये मुख्य भूमिका देखील केल्या. त्यात “माझी आई तिचा बाप” या नाटकासाठी तिला अभिनयाचं नामांकनही मिळालं. पितृॠण, दुसरी गोष्ट, थँक्यू विठ्ठला, पुष्पक विमान या चित्रपटातून तिने भूमिका केल्या. रोहित शेट्टी यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या “ स्कूल कॉलेज आणि लाईफ” या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे.
पूर्वीने हॉलिवूडच्या प्रतिष्ठित स्टेला ॲडलर अकादमीमध्ये नाट्यप्रशिक्षण घेतलं आहे. पूर्वी एक निपुण भरतनाट्यम् नृत्यांगना आणि गुरू डॉ. संध्या पुरेचा यांची शिष्या आहे. नृत्यातील काही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती आणि युवा पुरस्कार तिला मिळाले आहेत. ‘द हाऊस ऑफ नृत्य’ ही तिची अकादमीही प्रस्थापित आहे. सध्या पूर्वी आयपीएल सामन्यांचे मराठीतून निवेदन करत आहे. हे एक वेगळंच आव्हान असल्याचं ती मानते. दहा वेगळे संघ. त्यातील वेगवेगळे खेळाडू. गेल्या १५ हंगामांचा इतिहास आणि रोज होणारे सामने यावर भारताचा माजी स्टार यष्टीरक्षक किरण मोरे, केदार जाधव, धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड यांच्यासोबत चर्चा करणं, तेही लाइव्ह कायर्क्रमात हे आव्हान ती उत्तम पेलत आहे. मराठीमध्ये असे कार्यक्रम करण्याची एक नवीन दिशा तिला मिळाली आहे. असे स्पोर्ट्स तसंच टेलिव्हिजन रिअॅलिटी शो करायची तिची प्रचंड इच्छा आहे. तेदेखील लवकरच घडेल, याची खात्री तिला आहे.
नव्या जगात जिथे स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये किंवा अभावाने आहे, अशा संधीची कवाडं उघडते आणि उत्तम काम करून भविष्यात येणाऱ्या स्त्रियांसाठी ती कवाडं उघडी ठेवते, ती खरी ‘लेडी बॉस.’ अशी पूर्वीची ‘द लेडी बॉस’ची व्याख्या सहजसोपी आहे. शिवाजी पार्कला भारतातील क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, याच पंढरीत जन्मलेल्या पूर्वीने कधीही विचार केला नसेल की, क्रिकेटसोबत आपले अशा प्रकारे नाते दृढ होईल. पूर्वीच्या रूपाने मराठी मातीतली अस्सल निवेदिका भेटली, याचा आनंद वेगळाच आहे.