Friday, July 11, 2025

बोल बहू अनमोल



  • काव्यकोडी : एकनाथ आव्हाड



बोल बहू अनमोल
गुरुजी म्हणे जाणून घ्यारे
थोरा-मोठ्यांचे बोल
अर्थ त्यांचा मनी रुजावा
हे बोल बहू अनमोल
लालबहादूर शास्त्री बोले
‘जय जवान जय किसान’
कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा
सदा करूया सन्मान
पंडित नेहरू सांगून गेले
‘आराम आहे हराम’
आळसात नका वेळ दवडू
फुलवा आपले काम
सावरकर सांगती आम्हा
‘लेखण्या मोडा बंदुका घ्या’
न डगमगता अन्यायाला
चोख तुम्ही रे उत्तर द्या
टिळक म्हणाले, ‘स्वराज्य माझा
जन्मसिद्ध हा हक्क’
देशासाठी जहाल होऊनी
करू शत्रूला थक्क
राणी लक्ष्मीबाई बोलून गेल्या
‘मेरी झाशी नहीं दूंगी’
मातृभूमीच्या रक्षणासाठी
त्वेषाने लढूयात जगी
थोरांचे हे बोल जाणूनी
जगणे करूया सार्थ
देशाची सेवा करण्यातच
आहे खरा परमार्थ.

--------------------------------------------------------------------------------------

१) अफूच्या बोंडांमध्ये
ही खरी असते
मसाल्याच्या पदार्थांत
रव्याप्रमाणे दिसते
दिवाळीतील अनारशात
हिचा उपयोग करतात
दाद देताना हास्याची
काय पेरली म्हणतात?

२) स्वयंपाकात याला आहे
महत्त्वाचे स्थान
तेलाच्या फोडणीत याला
मोहरीसारखा मान
उष्णतेचे विकार हे
कमी करतात राव
धणेसोबत कुणाचे
घेतले जाते नाव?

३) रात्री उत्तम झोपेसाठी
उपयोगी हे पडतात
वेलदोड्यासोबत अनेकदा
कॉफीतही घालतात
मिठाईमधील स्वाद,
सुगंधही वाढवतात
मधुमेह, संधिवातावर
उपयोगी कोण ठरतात?
उत्तर -

१. जायफळ
२. जिरे
३. खसखस

eknathavhad23 @gmail.com
Comments
Add Comment