आनंद....देण्या-घेण्यातला!


  • कथा : रमेश तांबे


'काही वेळानंतर फुलपाखरू थेट माणसांत येऊन बसले. अन् मोठ्या उत्सुकतेने बघू लागले. लोकांचे व्यवहार सुरू होते. पण देण्या-घेण्यात आनंद नव्हता'.


एकदा एक फुलपाखरू गेलं एका फुलाकडे अन् त्याला म्हणाले, ‘अरे फुला, मी तुझ्यातले मध खाऊ का रे?’



फूल म्हणाले, ‘खा, पण मला कळणार नाही असं खा.’ फुलाचं उत्तर ऐकून फुलपाखरू गोंधळलं अन् गेलं आईकडे. आईला म्हणाले, ‘आई आई फुलाच्या नकळत त्यातले मध कसे खायचे गं!’



आई म्हणाली, ‘अरे वेड्या तुला जेवढी भूक आहे ना, तेवढंच खायचं. म्हणजे फुलाला त्रास होणार नाही. कारण, जसं मध खाणं तुला अतिशय गरजेचं तसंच फुलालादेखील मध दुसऱ्याला द्यायचं असतं. फक्त एकच लक्षात ठेव, जोपर्यंत देण्या-घेण्यात आनंद आहे, तोपर्यंत कुणालाही त्रास नाही. पण एकदा का दोघांच्याही मनात स्वार्थ जागा झाला, हाव निर्माण झाली की, त्रास सुरू झालाच समज!’



फुलपाखराला आईचं बोलणं समजलं. ते झटपट फुलाकडे गेलं अन् मोठ्या आनंदानं मध खाऊ लागलं. फुलपाखराला मध घेण्यातला अन् फुलाला मध देण्यातला आनंद मिळू लागला. पोट भरताच फुलपाखरू उडून गेले. जाता जाता त्याने मोठ्या आनंदाने फुलाचे आभार मानले. फुलानेही त्याला हसून प्रतिसाद दिला.



आता फुलपाखरू गेलं आपल्या मित्रांकडे. म्हणाले, ऐका हो ऐका... घेण्यातही आनंद आहे, अन् देण्यातही आनंद आहे. गरज असेल तेवढेच घ्या. कमी नको, जास्त नको. उद्याची चिंता करू नका. उगाच साठा करू नका! सगळ्यांनी अगदी कीटक, पक्षी, प्राणी, झाडे, वेली, नद्या, समुद्र साऱ्यांनीच फुलपाखराचं बोलणं ऐकलं. सारेच खूश झाले... सगळ्यांनाच आनंदाची बाग सापडली!



काही वेळानंतर फुलपाखरू थेट माणसांत येऊन बसले. अन् मोठ्या उत्सुकतेने बघू लागले. लोकांचे व्यवहार सुरू होते. पण, देण्या-घेण्यात आनंद नव्हता. प्रत्येकजण दुसऱ्याला फक्त ओरबडत होता. फुलपाखरू म्हणाले, ‘अरे माणसा हवे तेवढे खुशाल घे. पोटभर खा. पण साठवणूक करू नकोस.’ माणसांना सांगून सांगून फुलपाखरू दमून गेले. हतबल झाले. देण्या-घेण्यातला आनंद, त्यातले समाधान माणसांना समजावून देता आले नाही म्हणून फुलपाखरू निराश मनाने माघारी फिरले.



जाता-जाता रस्त्यात फुलपाखराला लहान मुलं दिसली. ती आनंदाने खेळत होती, नाचत होती. बोरं, करवंद, चिंचा पाडून एकमेकांना देत होती. ते पाहून फुलपाखराला आनंद झाला. चला कुणीतरी देण्या-घेण्यातला आनंद घेत जगत आहे. फुलपाखरू आनंदाने निघाले, रंगिबेरंगी पंख हलवत, गिरक्या घेत, गाणे गुणगुणत...
घ्या रे सारे आनंदाने
द्या रे सारे आनंदाने!

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,