-
स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
महाराष्ट्रात लावणी खऱ्या अर्थाने जगविण्यासाठी आजच्या पिढीने पुढे येणे गरजेचे आहे. लावणीतील अदाकारी ही जपली गेली पाहिजे. आज गौतमी पाटील सादर करते ती लावणी नव्हे, तर ती डीजे लावणी आहे. त्याचा लावणीशी काहीही संबंध नाही, तो डीजे लावणी शो असल्याचे महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले.
आजच्या पिढीचा डीजेकडे असलेला ओढा पाहता प्रेक्षकवर्ग याकडे अधिक वळलेला दिसून येत आहे. लावणीप्रमाणे भासणारा गौतमीचा हा डीजे शो आज बराच गाजतो आहे, वाजतो आहे. पण यात लावणीची अदाकारी दिसून येत नसल्याने लावणी आणि डीजे लावणीत बरंच अस्मानी अंतर दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. ‘कारभारी दमानं…’ तसेच ‘या रावजी बसा भावोजी,’ ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ याशिवाय ‘झाल्या तिन्हीसांजा’ या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांच्या लावण्या अखंड महाराष्ट्रभर गाजल्या आहेत. आजही गाजताहेत. त्यांनी सादर केलेल्या लावण्या या मराठी प्रेक्षकांच्या ओठी रुळल्या आणि अंतरी ठसल्यादेखील आहेत. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली आहे.
सुरेखाताई पुणेकर यांनी लावणीची परंपरा महाराष्ट्रात आपल्या अदाकारीने आजवर अखंड जपली आहे. लावणी गाऊन सादर करणं तसेच बैठकीची लावणी सादर करताना लावणीची नजाकत प्रेक्षकांना भावणारी ठरली आहे. मात्र आजच्या तरुण पिढीकडून लावणीची होणारी हेळसांड पाहिली, तर दुःख झाल्यावाचून राहत नाही. सुरेखाताई सांगतात, “लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. मान आहे, परंपरा आहे. पण लावणीचं आजचं रूप पाहिलं आणि काहीसा होणारा धिंगाणा पाहिला, तर या लोकपरंपरेचं भविष्य काय हा प्रश्न उद्भवल्यावाचून राहत नाही. आजच्या लावणीचं रूप पाहता लावणी जगली पाहिजे. लावणी जगवली पाहिजे. लावणीची अदाकारी जपली गेली पाहिजे. आजच्या तरुण पिढीने, प्रेक्षकांनी तिचा सन्मान केला पाहिजे”, असं सुरेखाताई आजच्या लावणीचं रूप पाहता आवर्जून सांगतात.
आज प्रसिद्धीसाठी अनेक चाळे केले जातात. प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवलंही जातं. अंगविक्षेप करून चित्रविचित्र हावभाव करून रसिकांना गुंग केलं जातं. पण लावणीचा बाज टिकून राहिलेला दिसून येत नाही. या कलेचा मान ठेवलेला दिसून येत नाही. कलेचा अशा रीतीने होणारा अपमान आणि अंगविक्षेपाने जिथे खुद्द स्त्री वर्गाचीच मान खाली जाईल, असे वर्तन केले जाते तिथे कला कशी जगणार? आणि त्या कलेचा सन्मान कसा होणार?
सुरेखाताई म्हणाल्या, “लावणीच्या अदाकारी जपताना ‘कारभारी दमान… या रावजी बसा भावोजी…, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या गाण्यांचे आजवर अनेक शो केले आहेत. या लावण्या स्वतः गाऊन सादर करताना लावणीच्या अदाकारी जपल्या गेल्या आहेत. लावणी परंपरा जतन करताना पुरुष वर्गासोबत स्त्रीयांनीही या लावण्या पाहाव्यात अशा रीतीने परंपरेचा धागा जपला आहे. पण आज निराळा प्रेक्षकवर्ग पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया, मीडियाच्या साथीने प्रसिद्धीचा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे कलेचा वारसा जतन करण्यापेक्षा प्रसिद्धीचा कौल कसा मिळवता येईल, याकडे आजची पिढी झुकताना दिसून येत आहे.”
खरं तर आज अनेक रिअॅलिटी शो होतात. नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. मात्र जिथे कार्यक्रम होताना मारामाऱ्या होतात, स्त्री वर्गाची मान झुकेल, असे वर्तन केले जाते. तिथे आजच्या पिढीला एकच सांगणं सुरेखाताई सांगतात, “लावणीचे कार्यक्रम करताना प्रेक्षकांनीही भान ठेवलं पाहिजे. कार्यक्रम चालू झाला की, प्रेक्षकच जिथे नाचायला सुरुवात करतात. तिथे लावणी करणाऱ्यांनी ती सादर कशी करायची? त्याचबरोबर लावणी करणाऱ्या तरुणींनीही याचं भान ठेवलं पाहिजे, आपण जिथे कार्यक्रमाचा, शोचा मोबदला घेतो, त्या बदल्यात तो कार्यक्रम उत्कृष्ट देणं आपल्या हातात असतं. अंगविक्षेप करून, तिथे मारामाऱ्यांसारखे प्रसंग उद्भवण्यापर्यंत वेळच येऊ देऊ नये.”
सुरेखाताई महिला वर्गासाठी विचार मांडताना सांगतात, “लावणी ही महिलांनी पाहण्याजोगीही असली पाहिजे. संस्कृतीचा मान राखत महिलांचा विचार करून लावणी सादर झाली पाहिजे. कारण, आज महिलाही लावणी पाहायला येतात. त्यामुळे लावणीचा व कलेचा प्रेक्षक म्हणून आलेल्या महिलांची मान झुकणार नाही, अशी लावणी सादर करत लावणी परंपरा जपली गेली पाहिजे”, असे सुरेखाताईंनी आवर्जून सांगितले.