ठाणे (प्रतिनिधी) : अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी मोठी आग लागल्याची घटना घडली. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागली त्या परिसरात धुराचे मोठे लोट उसळले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांमध्ये घबराट उडाली. संबंधित घटना नेमकी का घडली? ते सुरुवातीला समजत नव्हते. आग लागल्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागली. थोड्या वेळाने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
आगीच्या घटनेमुळे कर्जतकडे जाणारा रेल्वेमार्ग बंद झाला. ही वेळ गर्दीची असल्याने लाखो प्रवासी कार्यालयांतून घरी जायला निघाले होते. अशा वेळी रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते.
संबंधित घटनेमुळे रेल्वे स्थानकावर तासभर रेल्वे गाडी उभी होती. प्रवाशांची प्रचंड गर्दी फलाटावर बघायला मिळाली. कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबल्याने कल्याणच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना आणि मेल एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
- अंबरनाथ रेल्वे स्थानकात कर्जत दिशेला रेल्वे रुळाच्या बाजूलाच रेल्वेची इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्याच्या केबिनमध्ये असलेल्या वायर्सला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.
- या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघू लागले. त्यामुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग बंद करण्याची वेळ रेल्वेवर आली.
- या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग तासाभर बंदच होता.
- अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक मेल एक्स्प्रेस उभी करून ठेवण्यात आली होती.