ब्रिटन (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाचे डोळे एका भव्य आणि आगळ्या-वेगळ्या सोहळ्याकडे लागले होते तो ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला आहे. आर्चबिशप यांनी झुकून चार्ल्स तृतीय यांच्याप्रति आपला आदर व्यक्त केला. त्यांनी राजे चार्ल्स यांच्याप्रति निष्ठेची शपथ घेतली. क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांनाही यावेळी राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना कोणतीही शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. ब्रिटनच्या राजघराण्यात १९५३ नंतर म्हणजे तब्बल ७० वर्षांनंतर पहिल्यांदा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये हा सोहळा झाला. जगातल्या सर्वांत लक्षवेधी राजेशाहीचा थाट आणि त्याची तयारी काटेकोरपणे झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, युक्रेनचे पंतप्रधानांसह जगभरातून दिग्गज व्यक्ती या राज्यारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जगभरातील २०३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राजे चार्ल्स (तृतीय) यांनी वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये बोलताना म्हटले की, ‘मी इथे सेवा घ्यायला नाही, तर सेवा करायला आलोय’.
राज्याभिषेकादरम्यान राजे चार्ल्स यांना शपथ देण्यात आली. त्यांना विचारण्यात आले की, तुमच्या कार्यकाळात तुम्ही कायदा आणि चर्च ऑफ इंग्लंडची व्यवस्था राखणार का? त्यानंतर राजे चार्ल्स यांनी पवित्र गॉस्पेलवर हात ठेवून शपथ घेतली. यावेळी किंग चार्ल्स सेंट एडवर्ड मुकुट परिधान केला. रत्नजडित मुकुटासह राजदंड, अंगठी आणि चांदी-सोनेमिश्रित असलेला चमचा अशा पवित्र आणि पारंपरिक वस्तू राजाला बहाल करण्यात आल्या.