जिंदगी एक सुलगती-सी चिता हैं ‘साहीर’

Share
  • नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
जगजीतसिंग यांनी संगीताने सजवून, जिवंत करून, सादर केलेली अशीच एक भावमधुर गझल म्हणजे ‘कौन कहता हैं मुहब्बतकी जुबां होती हैं!’

हिंदी फिल्म-संगीत रसिकांना साहीरचे नाव माहीत नाही, असे सहसा होत नाही. मात्र ते असतात सिनेगीतकार साहीर लुधियानवी. उर्दू गझल रसिकासाठी दुसरेही एक साहीर आहेत. त्यांचे कवितेतले नाव जरी साहीर होशियारपुरी असले तरी ते पूर्णत: खरे नाही. ‘साहीर होशियारपुरी’ यांचे मूळ नाव राम प्रकाश शर्मा!

पंजाबमधील होशियारपूर शहरात ५ मार्च १९१३ला जन्मलेले राम प्रकाश शर्मा यांनी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी होशियारपूरच्या शासकीय महाविद्यालयातून फारसी भाषेत एम.ए.ची पदवी प्राप्त केली. जरी त्यांनी काही काळ पत्रकारिता केली होती तरी साहीर होशियारपुरी ओळखले जात ते प्रामुख्याने त्यांनी लिहिलेल्या उर्दू नज्म आणि गझलांसाठी! नरेंद्र कुमार शाद यांच्याबरोबर साहीर यांनी ‘चंदन’ या उर्दू मासिकाचे संपादनही केले होते. त्यांनी विपुल लेखन केले होते. मात्र आज त्यांचे केवळ ५ कवितासंग्रह उपलब्ध आहेत. उत्कृष्ट लेखनासाठी १९८९ साली त्यांना ‘गालिब संस्थान’तर्फे गालिब पुरस्कारही देण्यात आला होता. गेल्याच महिन्यात त्यांची ११०वी जयंती झाली.

होशियारपुरी यांच्यासारख्या शायरांच्या अनेक सुंदर गझला जर जगजीतसिंग यांच्या नजरेस पडल्या नसत्या, तर त्या फार मोठ्या समुदायापर्यंत कधीच पोहोचल्या नसत्या. जगजीतसिंग आणि चित्रासिंग या जोडीने त्या रसिकांपर्यंत पोहोचविल्या! अनेकदा चांगल्या संगीतकारामुळे, गायकामुळे रसिकांना अशा कलाकृतींचा आस्वाद घेणे शक्य झालेले असते. अनेक, काहीशा अवघड, गझला कवितेची जबरदस्त समज असलेल्या या जोडीच्या गळ्यातून आल्यामुळेच लोकप्रिय आणि अजरामर झाल्या आहेत.

हल्ली तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे पुस्तक घेऊन कविता वाचणे कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे संभाव्य अर्थार्जनाची क्षमता आणि लोकप्रियता केवळ हेच निकष समोर ठेवून लिहिलेले सवंग अभिरुचीचे साहित्य सोडले, तर अभिजात साहित्य संपण्याचा आणि त्यातून समाजमनाचे जे संगोपन, मूल्यपोषण होत असते तेही थांबण्याचा मोठा धोका आहे.

एखादी कविता जेव्हा पुस्तकातून बाहेर येते, मैफलीत गायली जाते, कॅसेट, चित्रफीत किंवा सीडीमध्ये रेकोर्ड होते तेव्हाच तिची पोहोच वाढते आणि ती अगणित रसिकांपर्यंत पोहोचते. अनेक वर्षे, वेगवेगळ्या काळात, एकेका पिढीपर्यंत पोहोचत राहते. ज्या कथा-कवितांबाबत असे होत नाही ते कितीही उत्तम, सकस साहित्य असले तरीही दुर्लक्षितच राहते. जशा संजय दत्तच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’मधल्या अंधाऱ्या ग्रंथालयाच्या थंड पडलेल्या कपाटात अनेक अप्रतिम ग्रंथ पडून राहतात तसे! एखादा सज्जन ‘कयामत’पर्यंत प्रेषिताची वाट पाहत थांबावा तशी त्यांची अवस्था होते.

जगजीतसिंग यांनी संगीताने सजवून, जिवंत करून, सादर केलेली अशीच एक भावमधुर गझल म्हणजे ‘कौन कहता हैं मुहब्बतकी जुबां होती हैं!’ एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झालेल्या या गझलेचे त्यांनी चक्क द्वंद्वगीत करून टाकले होते. साहीरजी या गझलेत जणू स्वत:लाच विचारतात – ‘प्रीतीची एखादी वेगळी भाषा असते का हो?’ मग प्रश्नाचे उत्तरही तेच देतात, ‘छे! प्रेमाची काही वेगळी भाषा थोडीच असते? प्रेमाची कहाणी तर फक्त प्रेमिकांच्या भावुक नजरेतूनच जाहीर होत असते.’
फक्त तशी नजर ओळखणारी दृष्टी हवी!

कौन कहता है मुहब्बतकी ज़ुबाँ होती है?
ये हकिकत तो निगाहोंसे बयाँ होती है.

आणि तसेही हे खरेच नाही का? प्रेमात पडलेल्या त्या दोघांना वाटत असते की जे चालले आहे ते फक्त ‘आपल्या दोघात!’ आपले गोड गुपित कुणालाच माहीत नाही. ‘आपण सांगितले नाही, तर ते कुणाला कळणार तरी कसे?’ अशी सुरुवातीला त्यांची भाबडी समजूत असते. पण, प्रेम लपत नसतेच. मालती पांडेच्या आवाजातील गदिमांचे एक सुंदर भावगीत होते –

‘लपविलास तू हिरवा चाफा,
सुंगध त्याचा लपेल का?
ही प्रीत लपवूनी लपेल का?’

तसेच प्रेम चाफ्याच्या सुगंधासारखे सगळीकडे पसरते असे गदिमा सांगतात. साहीर होशियारपुरी म्हणतात – ‘कसले ते प्रेमातले विचित्र क्षण! तिच्या भेटीची केवढी आस लागून राहते. निदान नजरभेट तरी व्हावी म्हणून जीव किती आसुसून जातो! ती जीवलग व्यक्ती आली नाही, तर सतत किती घालमेल होत राहते?’ आणि ती आलीच तरी काय? भेट झाली म्हणून मनाला स्वस्थता थोडीच लाभते? उलट तिच्या येण्याने, कशाबशा शक्य झालेल्या त्या अवघड भेटीने मनाची अस्वस्थता तर अजूनच वाढते!

वो न आये तो सताती है, ख़लिशसी दिलको…
वो जो आये तो, ख़लिश और जवाँ होती है!

पण, माझी प्रिया किती वेगळी आहे! तिच्या नुसत्या कल्पनेनेही ती अंतर्मनाला, माझ्या आत्म्यालाच, प्रसन्न करून टाकते. माझे मन तिच्या नुसत्या आठवणीनेसुद्धा उजळून निघते. इतकी तेजस्विता, इतकी प्रसन्नता सगळ्यांच्यात थोडीच असते?

रूहको शाद करे, दिलको जो पुरनूर करे.
हर नज़ारेमें ये तनवीर कहाँ होती है.

जेव्हा माझ्या मनात तिच्याबद्दलच्या प्रेमाला पूर येतो, मन अनावर होते तेव्हा मी त्याला कसे आवरणार? तसे कुणाही प्रेमिकाच्या मनात जे असते ते त्याच्या डोळ्यांतून प्रतीत होतेच ना?-

ज़ब्त-ए-सैलाब-ए-मुहब्बतको कहाँतक रोकें,
दिल में जो बात हो आँखोंसे अयाँ होती है.

प्रेमाचे सगळे विश्व मोठे विचित्र असते. हे प्रीतीचे वेड जगण्याला एखाद्या चितेसारखे करून टाकते. प्रेम मनाला सतत अस्वस्थच ठेवते. ही चिता धड पेटून निखारेही बनत नाही आणि विझून, धूर बनून, हवेत विरूनही जात नाही! मग बिचाऱ्या प्रेमिकाने काय तरी करावे?

ज़िन्दगी एक सुलगती-सी चिता है ‘साहिर’
शोला बनती है न ये बुझके धुआँ होती है.

प्रेमाची पूर्तता होत नाही, तोवर मनात होणाऱ्या घालमेलीचे यापेक्षा चांगले काय वर्णन कोण करू शकणार? भलेही तारुण्यातील, हातातून कायमच्या निघून गेलेल्या एखाद्या सोनेरी क्षणात, पुन्हा जाणे शक्य नसले तरी त्याची नुसती आठवणसुद्धा किती सुखद असते? किती हुरहूर लावते! आत आत खोलवर एक अनामिक भावना जागी करते? ते सगळे वेडेपण पुन्हा एकदा क्षणभर तरी अनुभवता यावे म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago