Tuesday, April 22, 2025

अमृताचा घनू…

  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

मराठी ही केवळ मराठी भाषकांची भाषा नाही, तर तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर मला अशी मराठी भाषाप्रेमी माणसे भेटत राहिली. शाळेत असताना बाबांकडे मराठी शिकायला मर्जी पक्का नावाचा पारसी मुलगा यायचा. बाबांना मास्टरजी म्हणणारा हा मुलगा अतिशय हळुवारपणे मराठीतून संवाद साधायचा. आमच्या मजल्यावर होमी अंकल नावाचे पारसी गृहस्थ राहायचे. होमी अंकल त्यांच्या स्वत:च्या शैलीत मराठीत बोलायचे तेव्हा ऐकताना मजा वाटायची.

प्रत्येकच वर्षी महाविद्यालयात मराठी विभागाच्या कार्यक्रमात भाग घेणारी मुले असायचीच असायची. पवित्र भट हा असाच एक मुलगा. ना. धो. महानोरांच्या कवितेवरचा नृत्याविष्कार त्याने सादर केला होता. हा दाक्षिणात्य मुलगा अतिशय सुंदर मराठी बोलतो. नुकतीच त्याला केंद्र सरकारची युवा कलांवत म्हणून शिष्यवृत्ती मिळाली. दिविजा नावाची माझी एक दाक्षिणात्य मैत्रीण इतके सहजसुंदर मराठी बोलते की, ऐकतच राहावे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात डॉ. विभा सुराणा भेटल्या. संभाषणात्मक मराठीसाठी त्या सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. जर्मन विभागाने मराठीकरता असे अभिनव प्रयत्न करणे हे कौतुकास्पद आहे.

मी ज्या उदयाचल शाळेत शिकले, तिथे एक तरुण शिक्षिका होती. धनलक्ष्मी नावाची. लग्नानंतर ती कनुप्रिया झाली. मूळ तेलुगूभाषी होती आणि ती अप्रतिम हिंदी शिकवायची. सांस्कृतिक कार्यक्रम, निवेदन अशी सर्व जबाबदारी ती लीलया पेलायची. कविता, संगीत, साहित्य इत्यादी कलांवर तिचे अतोनात प्रेम. हिंदीप्रमाणेच मराठीतही कनुप्रिया सुंदर कविता लिहिते. विचारांची व्यापक बैठक, चिंतनशील पिंड, स्वत:ची अत्यंत ठाम मते नि संवेदनशील मन यातून ती आकार घेते. कविता करणे म्हणजे मन मोकळे करणे, असे तिला वाटते. तिचे जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे मराठी माध्यमातील मुलांवरचे प्रेम.

ती म्हणते, ‘इंग्रजी माध्यमातील मुले सातासमुद्रापार जातात, स्वत:चे जग निर्माण करतात, याचे काही आश्चर्य वाटत नाही, पण मराठी माध्यमातील मुले असे काही करतात तेव्हा त्यांचे कौतुक वाटते, असे ती म्हणते. तसे तिने सर्वच विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम केले, पण मराठी माध्यमातील मुलांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करावी, म्हणून कनुप्रियाने प्रामाणिक प्रयत्न केले. तिच्या मराठी कविता नि ललित लेखनाचा संग्रह नुकताच व्यास क्रिएशन्सने प्रकाशित केला. अंशिकेचा अंश नावाच्या या संग्रहात तिचे नितळ मन ठळकपणे जाणवते.

मराठीवर नितांत प्रेम करणारे असे भाषाप्रेमी मराठीची माधुरी अधिक वाढवतात. मराठी ही कुणा मूठभर माणसांची जहांगिरी नाही. ती सर्वांना सामावून घेते. तिच्या अमृताचा घनू असंख्य मराठीप्रेमींना चिंब भिजवतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -