Friday, September 19, 2025

‘अगं अगं सूनबाई, काय...’ घेणार निरोप

‘अगं अगं सूनबाई, काय...’ घेणार निरोप
  • ऐकलंत का!: दीपक परब

अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली. त्यामुळे निर्मात्यांनी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेची स्टारकास्ट उत्तम आहे.

मालिकेचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. प्राईम टाईममध्ये ही मालिका प्रसारित केली जात आहे. पण तरीही टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार, टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका ३५व्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ०.९ रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत घराघरात घडणारी सासू-सुनांची भांडणं विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली होती. आजच्या आधुनिक काळात, सासू-सुनेमधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं याचा धमाल प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत सुकन्या कुलकर्णी आणि स्वानंदी टिकेकर मुख्य भूमिकेत होते. या मालिकेची जागा ‘खुप्ते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम घेणार आहे. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुपिते उलगडली जाणार आहेत.

Comments
Add Comment