-
डॉक्टरांचा सल्ला: डॉ. रचिता धुरत
कधीकधी रुग्णाला काही आजार असतील, तर रक्तातील साखरेचे प्रमाण, चरबीचे प्रमाण व इन्सुलीनचे प्रमाण मोजण्यासाठी रक्त तपासणी करावी लागते.
आजच्या भागात आपण मानेचा काळपटपणा या चर्मरोगाविषयी जाणून घेणार आहोत. यालाच अकान्थोसिस निग्रिकान्स (Acanthosis Nigricans) असे म्हणतात. काही लोक याला मानेचा मळ म्हणून चामडी घासून याकडे दुर्लक्ष करतात. या आजारात शरीरातील एक किंवा एकापेक्षा जास्त भागात (folds) चामडी काळी व जाड होते. बरेचदा चमडी मखमलसारखी मऊ जाणवते. हे सहसा त्वचेच्या घड्या/स्किन फोल्ड्स (skin folds) मध्ये बघायला मिळते, जसे मान, काख व जांघेतिल फोल्ड्स वगैरे. हा आजार संसर्गजन्य नाही व हानिकारक पण नाही, परंतु हे एक अंतर्गत/शारीरिक आजार असल्याचे लक्षण आहे व वेळीच रुग्णाला एक धोक्याची सूचना देते. कारण या आजाराची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. इन्सुलिन हॉर्मोनचा प्रतिकार (insulin
resistance).
२. आनुवंशिकता
३. लठ्ठपणा
४. औषधे – काही गोळ्यांचा गैरवापर जसे, निकोटिनिक एसिड, ग्लुकोकोर्तिकोइद्स, डायाएथिल स्टिलबेस्ट्रोल, गर्भनिरोधक गोळ्या, ग्रोथ हॉर्मोन, एस्ट्रोजन, वगैरे.
५. एंडोक्राइन ग्रंथी (endocrine gland) च्या अकार्यक्षमतेशी निगडित – या प्रकारात अनियंत्रित मधुमेह, ओवेरियन हायपरएंडरोजेनीसम, पीसीओएस (PCOS-polycystic ovarian syndrome) या आजारांचा समावेश होतो.
६. एक्रल अकान्थोसिस निग्रिकान्स (acral acanthosis nigricans)- यात कोपर, गुडघा, हाताची व पायाची बोट याची त्वचा काळी व जाड होते.
७. म्यलीगनंट अकान्थोसिस निग्रिकान्स (malignant acanthosis nigricans)- याचा संबंध कर्करोगाशी येतो. कधीकधी अकान्थोसिस निग्रिकान्स हे अंतर्निहित कर्करोगाची सूचना देतात व रुग्णाला लगेच जागृत करतात. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला फायदेशीर ठरतो.
लक्षणे
१. काखेतील, मानेवरची, चेहऱ्यावरील गालाच्या हाडबाजूची त्वचा व जन्घेतील त्वचा काळी पडते व जाड होणे. याचे निदान कसे करायचे?
१. याचे निदान वैद्यकीयदृष्ट्या रुग्णाला पाहून केले जाते, त्यामुळे त्वचा रोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन गरजेचे ठरते.
२. कधीकधी रुग्णाला काही आजार असतील, तर रक्तातील साखरेचे प्रमाण, चरबीचे प्रमाण व इन्सुलीनचे प्रमाण मोजण्यासाठी रक्त तपासणी करावी लागते.
उपचार
१. ९० टक्के रुग्णांमध्ये वाढलेले वजन या आजारासाठी कारणीभूत असते त्यामुळे वजन कमी करणे व त्याचबरोबर जेवणामध्ये तेल, साखर कमी खाणे (कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करणे) फायदेशीर ठरते.
२. नियमित व्यायाम आणि जेवाणातील बदल यामुळे या आजारात बराच फायदा होतो.
३. इन्सुलिन हॉर्मोनचा प्रतिकार कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टारांचा सल्ला मोलाचा ठरतो. जे तुम्हाला काही गोळ्या देऊन इन्सुलिनचे वाढलेले प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
४. त्वचा रोग तज्ज्ञ तुम्हाला लावण्यासाठी क्रीम्स देतात ज्यामुळे काळेपणा व जाड चामडी कमी होण्यास मदत होते.
सारांश
अकान्थोसिस निग्रिकान्स हा जरी सर्वसाधारण आजार वाटत असेल; परंतु हे एक लक्षण आहे जे रुग्णाला अंतर्निहित आजाराबद्दल वेळीच जागृत करते, अशावेळी त्वचा रोगतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ते उपचार करणे गरजेचे ठरते. त्याचवेळी घरगुती उपाय करणे टाळले पाहिजे, ज्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो व त्वचा नेहमीसाठी खराब होऊ शकते.