Friday, July 19, 2024
Homeमहामुंबईभटक्या कुत्र्यांचा त्रास थांबणार?

भटक्या कुत्र्यांचा त्रास थांबणार?

जूनपासून होणार गणना; तीन ते चार महिन्यांत अहवाल सादर होणार

मुंबई (प्रतिनिधी) : भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मुंबईकरांना रात्री अपरात्री, भल्या पहाटे त्रासाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा कुत्र्याने लचके तोडल्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे मुंबईत भटक्या कुत्र्यांची सध्या संख्या नेमकी किती आहे? हे कळावे यासाठी पालिकेने भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपासून या कामाला सुरुवात होणार आहे. गणनेच्या कामाकरिता मान्यताप्राप्त संस्थेची निवड केली आहे.

मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, पहाटे, रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्यावर हल्ला करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबईकरही या भटक्या कुत्र्यांपासून हैराण असतात. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना होणार आहे. जूनपासून पुढील तीन ते चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांची गणना करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. सन २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता मुंबईत २ लाख ९६ हजार २२१ भटके कुत्रे आढळले होते.

मात्र सध्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती? हे कळलेले नाही. याचा शोध घेण्यासाठी ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भटके कुत्रे दुचाकींच्या पाठी लागण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे दुचाकीस्वाराचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. तसेच पहाटे, मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी जोर धरत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -