नवी दिल्ली : भयंकर रक्तपात सुरू असलेल्या सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. याअंतर्गत वायुसेनेच्या १७ विमानांनी आणि भारतीय नौसेनेच्या ५ जहाजांनी ३ हजार ८६२ भारतीयांना मायभूमीत सुखरुप परत आणले आहे.
भारतीय वायुसेनेचे के. सी १३० हे विमान शुक्रवारी भारतीयांना घेऊन परत आले. त्याचबरोबर भारताच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमधून ३ हजार ८६२ नागरिकांना सुखरुप मायदेशात आणले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना दिली.
भारतीय वायुसेनेची विमाने सौदीच्या जेद्दाह शहरात, तर नौदलाची विनाशिका सुदानच्या बंदरात दाखल करुन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. २४ एप्रिल रोजी सुरु झालेली ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान ४७ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी ५ मे रोजी मायभूमीत परतले आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत तीन हजारहून अधिक भारतीयांना सुखरुप आणण्यात भारत यशस्वी झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सातत्याने या मोहिमेवर लक्ष ठेवून होते.
ऑपरेशन कावेरीबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, “ऑपरेशन कावेरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या धैर्याचे कौतुक आहे. खार्तूम येथील भारताच्या दूतावासाने या कठीण काळात चांगले सहकार्य केले आहे. सौदी अरेबियात तैनात टीम इंडिया आणि भारताशी समन्वय साधणाऱ्या MEA रॅपिड रिस्पॉन्स सेलचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात सर्व भारतीयांच्या घेतलेली सुरक्षेची जबाबदारी आणि त्याची वचनबद्धता हीच आमची प्रेरणा असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या १७ विमानांनी सूदान मधून उड्डाण करत सौदी अरेबियाच्या जेद्दा विमानतळापर्यंत भारतीयांना सुखरुप पोहचवण्यासाठी जवळपास पाच फेऱ्या मारल्या आहेत. सुदानच्या सीमेवर असणाऱ्या देशातून जवळपास ८६ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. तसेच जे भारतीय नागरिक सुखरुप सौदी अरेबियामध्ये पोहचले त्यांना आवश्यक ती मदत केल्यामुळे भारताने सौदी अरेबियाचे देखील आभार मानले आहेत.
भारताने फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, संयुक्त अरब या देशांचे देखील आभार मानले आहेत. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सौदी अरेबियात उपस्थित होते. याबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मुरलीधरन यांचेही कौतुक केले.