Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणउद्धव ठाकरे 'मन की' नाही 'धन की' बात करतात, महाराष्ट्रातील सर्वात मोठा...

उद्धव ठाकरे ‘मन की’ नाही ‘धन की’ बात करतात, महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल!

भाजप आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

राजापूर : कोकणाबद्दल कोणतीही माहिती नसलेला एक पर्यटक बारसूमध्ये लोकांना भेटायला आला आणि पेटवापेटवीचे काम करून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघून गेला. उद्धव ठाकरे हे ‘मन की’ नाही ‘धन की’ बात करतात, उद्धव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आणि कोकणाला लागलेला शाप आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

बारसू येथील रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध असेल, तर येथे प्रकल्प उभारू नका. अन्यथा महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. या मागणीसाठी व या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्यासाठी शनिवारी ६ मे रोजी राजापुरात भव्य रिफायनरी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रिफायनरी समर्थन मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर सडकून टीका केली.

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून कोकणातील राजकारण तापले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. तर, भाजपानेही रिफायनरी समर्थनार्थ कोकणात कार्यक्रम हाती घेतला आहे. ठाकरे आणि भाजपाच्या कार्यक्रमांना कोकणात परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्याकरता भाजपा नेते नितेश राणे यांनीही आज जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये प्रकल्प होण्याकरता लिहिलेल्या पत्राबाबत नितेश राणे यांनी आज पून्हा एकदा जोरदार टीका केली.

“ग्रीन रिफायनरी कोकणात होतेय, त्याचे समर्थन करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिले नाही म्हणून जैतापूरमध्ये उभे केले आहे.

ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितले की, आमचे पंतप्रधान मोदी फक्त ‘मन की बात’ करतात. ती भाषा कोणालाच कळत नाही. गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान जनतेच्या ‘मन की बात’ समजतात म्हणूनच लोकांनी त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. पण उद्धव ठाकरे ‘मन की बात’ समजतात की ‘धन की बात’ समजतात हे त्यांनी आम्हाला सांगावे. नेमके ते इथे पेटवण्याचे काम करण्याची भाषा करत आहेत, ते पेटवा पेटवी करण्यासाठी नाही तर आपल्या घरची, मातोश्रीची चूल पेटली पाहिजे याकरता ते येथे स्वतः आले आहेत.”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पंतप्रधानांना बारसूत रिफायनरी झाली पाहिजे अशा समर्थनार्थ पत्र काढले. आता विरोधी पक्षात असताना त्यांना ग्रीन रिफायनरीला विरोध करण्याचे स्वप्न पडताहेत. हा नेमका विचार कसा बदलला, हा विचार कोकणाच्या जनतेसाठी बदलला नाही, पण खिशात पैसे आले पाहिजेत, मातोश्रीवर खोके पोहोचले पाहिजेत याकरता विचार बदलला आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की, तेव्हाचे सरकार म्हणून केंद्र सरकारकडे जे पत्र पोहोचवले होते त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती. ते १०० खोके मातोश्रीकडे पोहोचले पाहिजेत म्हणून पत्र व्यवहार केला होता. उद्धवजींना विचारायचे आहे की हेलिकॉप्टरने कोकणात आला आहात, ठाकरे आणि ठाकरे कुटुंबांचा व्यवसाय काय, कोणता धंदा किंवा व्यवसाय करतात ज्यामुळे ते हेलिकॉप्टरमधून फिरतात”, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी कोकणातील बेरोजगारीबद्दलही ते बोलले. “सगळा पैसा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी कमवायचा का? माझ्या कोकणातील तरुण-तरुणांनी कमवायचा नाही का?” असा प्रश्न त्यांनी यावेळी ठाकरेंना विचारला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -