कर्जत (प्रतिनिधी) : रुग्ण आणि किडनीदाता या दोघांचेही रक्तगट वेगळे असताना किडनी प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात यशस्वरीत्या पार पडली आहे. कर्जतमधील एका १७ वर्षांच्या मुलाला त्याच्या आईने रक्तगट जुळत नसतानाही आपली किडनी दान करून मुलाला पुर्नजन्म दिला आहे. यामुळे रुग्णाला जीवदान मिळाले असून रक्तगट जुळत नसतानाही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान डॉ. अमित लंगोटे आणि त्यांच्या टीमने यशस्वी पार पाडले.
धनराज मेंढरे हा मुलगा किडनी आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे तो सात-आठ महिने डायलिसिसवर होता. या मुलाचे वडील नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होती. अशा सर्व अडचणीच्या परिस्थितीतून या मुलाच्या आईने पुढे येऊन रक्तगट वेगळा असतानाही किडनी दान करण्याचा निर्णय घेतला व या मुलाला नवीन आयुष्य मिळाले आहे. मेडिकव्हर रुग्णालयातील किडनीविकार तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे यांनी वेगवेगळ्या रक्तगटाच्या किडनी प्रत्यारोपण करण्याचे आवाहन स्वीकारले. रुग्ण व मूत्रपिंडदाता या दोघांचे रक्तगट वेगळे असतानाही ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयातील किडनीविकार तज्ज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे म्हणाले की, ‘जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा श्वासोच्छावासही कमी झाला होता. प्राथमिक स्थितीत त्याला किडनीचा आजार असल्याचे लक्षात आले. किडनीमध्ये जी घाण असते ती डोक्यात पोहोचून त्याची प्रकृती कोणत्याही क्षणी गंभीर झाली असती. मुलाला फिट्ससुद्धा येऊ शकल्या असत्या. अशा स्थितीत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून वैदयकीय चाचण्या करणे गरजेचे होते. त्यानुसार वैद्यकीय अहवालात किडनीची क्रिएटिन पातळी खूप जास्त असल्याचे लक्षात आले. कॅल्शियमचे प्रमाणही खूपच कमी होते. अशा स्थितीत मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान झाले. अशा वेळी तातडीने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यानंतर आईने किडनदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.