उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार प्रत्युत्तर
बेळगाव : काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दलाली करत बेळगावमध्ये आले. संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही. राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे आले. त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. तेव्हा त्यांना सांगायला हवे होते की येथे उमेदवार उभे करू नये. काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी संजय राऊत दलाली करत आले. शिल्लक सेनेकडे मुद्दे नसले की असे मुद्दे मांडतात. मात्र, शरद पवार यांनी त्यांचे सर्व मुद्दे नेस्तनाबूत केले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
संजय राऊत यांचा बेळगाव दौरा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुसरीकडे, विरोधात प्रचार करत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने सगळ्या राजकीय पक्षांना केले होते, पण तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव उत्तरचे भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी आल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. फडणवीस यांच्या धिक्काराच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिसांनी लगेच धाव घेत समिती कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणाकडे जाण्यापासून रोखले. पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी बेळगावात आलो आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख देखील मुख्यमंत्री असताना कर्नाटकात ते सगळीकडे फिरत होते. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी येथे आलो आहे. मराठी भाषकांच्या मागे मी आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच भाजपने मराठी बोर्ड येथे तयार केला.