Sunday, May 11, 2025

क्रीडाIPL 2025

गुजरातकडून राजस्थानचा धुव्वा

गुजरातकडून राजस्थानचा धुव्वा

जयपूर (वृत्तसंस्था) : राशिद खानसह गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर ९ विकेट राखून सोपा विजय मिळवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.



राजस्थानने दिलेले ११९ धावांचे लक्ष्य गुजरातने सहज पार केले. शुभमन गिलने ३६ धावांची भर घातली. ही एकमेव विकेट चहलने मिळवली. गिलने ३६ धावांच्या खेळीत ६ चौकार लगावले. गिल बाद झाल्यानंतर राजस्थानला गुजरातची एकही विकेट मिळवता आली नाही. वृद्धीमान साहा आणि हार्दिक पंड्या यांनी नाबाद खेळी खेळून गुजरातला १३.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. साहाने नाबाद ४१ धावा जोडल्या. या खेळीत त्याने ५ चौकार लगावले. पंड्याने १५ चेंडूंत नाबाद ३९ धावा चोपल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार फटकवले. गुजरातने १३.५ षटकांत विजयी लक्ष्य पार केले.



राशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांची दमछाक उडाली. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव १७.५ षटकांत ११८ धावांत संपुष्टात आला.



गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर जयपूरच्या फलंदाजांवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी पाच विकेट घेतल्या. १७.५ षटकांत राजस्थानचा संघ ११८ धावांवर सर्वबाद झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. आक्रमक जोस बटलर अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. तर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल धावबाद झाला.



यशस्वीने ११ चेंडूंत १४ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने २० चेंडूंत ३० धावा जोडल्या. लागोपाठ विकेट पडल्यामुळे राजस्थानचा डाव अडचणीत सापडला होता. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने शिमरोन हेटमायरला सात धावांवर बाद केले, तर ध्रुव जुरेलला ९ धावांवर नूर अहमदने तंबूत पाठवले.

Comments
Add Comment