लांजा (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणचे भाग्यविधाते आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना एक नगरपंचायत सांभाळता येत नाही, त्यांनी ना. नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्वावर बोलू नये. किंबहुना आपली पात्रता ओळखूनच राणे यांच्यावर बोलावे, असा टोला भाजपचे लांजा तालुका अध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर यांनी लगावला आहे.
मदार राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष महेश खामकर म्हणाले की, आमदार राजन साळवी हे कर्तव्यशून्य आमदार आहेत. आपल्या १४ वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी तालुक्याचा काय विकास साधला? तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाखाड्या नकोत, तर हॉस्पिटल पाहिजेत. मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेज पाहिजेत. एमआयडीसी पाहिजे. जेणेकरून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल. मात्र यासाठी आपण किती प्रयत्न केलेत आणि काय विकास साधला, हे एकदा सांगावे.
ज्या नगरपंचायतीवर आपली सत्ता होती ती नगरपंचायत आपल्याला सांभाळता आली नाही, अशांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणचे भाग्यविधाते नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलून पक्षाध्यक्ष उद्धव यांची शाबासकी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आ. राजन साळवी हे करत आहेत, अशी टीका महेश खामकर यांनी केली.
एका बाजूला बारसू येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थन द्यायचे आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातील स्थान टिकून राहावे. यासाठी पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करायचा हेच त्यांचे उद्योग आहेत.
बारसू हा प्रकल्प कोकणवासीयांसाठी फायद्याचा असणार आहे. येथील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. असे असताना या चांगल्या प्रकल्पाला एकीकडे विरोध करायचा आणि समर्थनही द्यायचे, ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. तालुक्यात एकही आमसभा न घेणारा आमदार अशी आ. साळवींची ख्याती आहे. म्हणूनच यापुढे आ. राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलू नये अन्यथा तुम्हाला जशास तसे उत्तर दिले जाईल. राणे यांच्याविरोधात काहीबाही बरळून पक्षप्रमुखांची शाबासकी मिळवण्याच्या नादात तुम्हाला हे प्रकरण अंगलट येईल. ते तुम्हाला महागात पडेल, असा इशारादेखील महेश खामकर यांनी दिला आहे.