अलिबाग : मान्सूनमध्ये दरडीसारख्या ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. अतिवृष्टी काळात महापूर, चक्रीवादळे, दरडी कोसळण्यावर मात करण्यासाठी यावेळी आधुनिक यंत्रणाही वापरली जाणार असून, या उपाययोजनांचा आढावाही घेतला जात आहे.
रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांमध्ये दरवर्षी वाढ होत असून, मागील १५ वर्षात १०३ वरून ही संख्या २११ वर गेली असल्याने येथे विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. मान्सून सुरू होण्यास अद्याप दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असताना दरडप्रवण गावातील उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तींचा मान्सूनपूर्व आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व अधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. यात विशेषतः दरडी कोसळू नये यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. रायगड जिल्ह्यात दरडीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा सर्वाधिक आहे. यासह दरडी कोसळून रहदारी विस्कळीत होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरडी कोसळल्यानंतर मदतकार्य राबविण्यापेक्षा आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन यावर गांभिर्याने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे म्हणणे आहे. दरडग्रस्त गावातील नागरिकांचे निरिक्षण त्यावर तज्ज्ञांनी मांडलेली मते यांचा सखोल अभ्यास करून यावर उपाय केले जात आहेत. पावसाचे सूक्ष्म निरिक्षण करता यावे यासाठी प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर कृषी विभागाकडून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्याच्या सूचना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केल्या आहेत. रायगडमध्ये असे ८२ महसूल मंडळ असून, यातील फक्त ५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू झाली आहेत.
“अतिवृष्टीमध्ये जमीन नरम होत असल्याने तीव्र उतारावरील माती न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली घसरते. सह्याद्रीच्या पट्ट्यात दरडींचे प्रमाण वाढलेले आहे. त्यास आपणच जबाबदार आहोत. झालेली वृक्षतोड, माती उत्खनन आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता डोंगर उतारावर बांधलेली घरे यास कारणीभूत आहेत. अशा परिस्थितही दरडींपासून होणारे नुकसान कमी करणे शक्य आहे. दरडी कोसळण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. या संकेतांची कल्पना तेथील नागरिकांना सर्वप्रथम येते. यासाठी दरडप्रवण गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यामुळे होणारी जीवित व वित्तहानी कमी करता येणे शक्य आहे”.
– प्रा. डॉ. सतिश ठिगळे, (निवृत्त विभागप्रमुख, भूशास्त्र विभाग – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
धरणांमुळे पुराचा धोका असलेली गावे
मुरुड तालुका : भोईघर, मांडला, बोर्ली.
तळा : वावा, राणेची वाडी, खैराट, बामणघर, अंबेशी.
पेण : आंबेघर
अलिबाग : श्रीगाव.
सुधागड : नवघर, कोंडगाव, पेडली, घोटवडे, परळी, केवळे, उद्धर, उन्हेरे.
श्रीवर्धन : बोर्ली पंचतन, गोंडघर, वडवली, कुडकी.
म्हसळा : बौद्धवाडी, विठ्ठलवाडी, पाभरेगाव, संदेरी, फळसप.
महाड : वरंझ, बारसघर, शिरवली, पांगारी, वरंडोली, नांदगाव, वलंग, जुई, सोनघर,खैरे.
पनवेल : सावणे,
जांभिवली, देवळोली.
दरडींमुळे वाहतूक विस्कळीत होणारी ठिकाणे
पोलादपूर तालुका : कशेडीघाट
अलिबाग तालुका : कार्लेखिंड
माणगाव तालुका : ताम्हाणीघाट
पोलादपूर तालुका : आंबेनळीघाट
खालापूर तालुका : अंडा पॉइंट
रोहा तालुका : भिसे खिंड
रोहा तालुका : सुकेळी खिंड