निलेश राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली
राजापूर : राजापूर तालुक्यात बारसूत रिफायनरी व्हावी म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पत्र दिले आणि आता हे कोकण पेटवण्याची भाषा करताहेत, हे स्वत: विझले आहेत, यांच्याकडे माचिस आहे आहे का? हे काय पेटवणार? पेटवायला आहे कोण? यांच्या काड्या विझलेल्या आहेत. उद्धव ठाकरे याला कोकणाशी काही देणेघेणे नाही. हा ढोंगी आहे. याला केवळ पैसा हवा. घर चालवायचं कसं असा यांना आता प्रश्न पडला आहे. पैशासाठी याने आधी पत्र दिले आणि आता हाच माणूस पैशासाठी विरोध करत असून गरज पडल्यास कोकण पेटवण्याची जाहीर भाषा करत आहे, यांची नियत काय आहे ते दिसत आहे, कोकणातील जनता सुज्ञ आहे, यांना आता कोकणार कोणीही थारा देणार नाही, अशा कठोर शब्दांत भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
बारसूत रिफायनरीला विरोध करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सरकारने हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. यावर निलेश राणे सडेतोड प्रत्युत्तर दिले.
‘भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. या मागणीसाठी व या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्यासाठी शनिवारी ६ मे रोजी राजापुरात भव्य रिफायनरी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या समर्थन मोर्चात आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू, रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे नेते हनिफ मुसा काझी यांच्यासह सर्वपक्षीय समर्थक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. मात्र तरीही बाहेरून येणारी काही मंडळी प्रकल्पाच्या विरोधात नारा देत स्थानिकांना चुकीची माहिती देऊन भडकविण्याचा व वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना प्रकल्पासाठी बारसूच्या जागेचे पत्र पंतप्रधानांना दिलेले असतानाही आता तेच या प्रकल्पाला विरोध करत असून आता प्रकल्प स्थळी येऊन विरोधाची भाषा करत आहेत.
या समर्थन मोर्चाला राजापूर शहरसह ग्रामीण भागातील सर्व समर्थक, विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, विविध वाहतूक संघटना, व्यापारी संघटना, आंबा बागायतदार असे हजारो लोक उपस्थित होते. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात हा मोर्चा काढण्यात आला.
आमचा कोणालाही विरोध नाही तर कशाप्रकारे हा प्रकल्प तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वाचा ठरू शकतो हे सांगतानाच समर्थनाची शक्ती किती मोठी आहे हे दाखवून देण्यासाठी हा समर्थन हा मोर्चा काढण्यात आल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.