Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखहनी ट्रॅपने घेतला संशोधकाचा बळी!

हनी ट्रॅपने घेतला संशोधकाचा बळी!

सामाजिक, राजकीय, प्रशासकीय किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात वावरताना प्रत्येकाने किमान काही मूल्यांचे पालन हे करायलाच हवे. मानवी मन हे विलक्षण आहे. ते समजून आणि उमजून घेण्यात अवघड आणि अत्यंत क्लिष्ट असते. मन हे कायम बदलणारे असते आणि ते व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या भाव-भावना दाखवते. या भावनांमधील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना एकत्रितरीत्या षड्रिपू किंवा षडरिपू असे म्हटले जाते. रिपू म्हणजे दोष अथवा शत्रू होय. अशा दोषांचे प्रमाण आपल्या भावनिक आणि मानसिक अवस्थांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त झाले की मानवी वर्तन हे स्वत:ला आणि समाजाला विधायक न ठरता विघातक ठरते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व कमालीचे घसरते आणि सामाजिक प्रतिष्ठा, सहजीवन आणि परस्पर सहकार्याने यामध्ये दोष अथवा बाधा निर्माण होतात. बऱ्याचदा आपल्याला या षडरिपूंनी घेरले आहे आणि आपण चक्रव्यूहात फसलो आहोत, हे लवकर लक्षात येत नाही.

मोहात पाडू शकणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या अासपास असतात. पण त्यापासून सावधता बाळगणे गरजेचे असते, तर कधी आकर्षक व्यक्तींचा गैरवापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याची पद्धत अवलंबिली जाते. त्याला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. इंग्रजीमध्ये हा शब्द चांगलाच प्रचलित आहे. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. ‘हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात. महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी उदाहरणे बघायला मिळतात. राजकारण, कॉर्पोरेट, क्रीडा सर्वच क्षेत्रांमध्ये कधी ना कधी याचा वापर हा होत आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदलले आहे. पूर्वी ‘हनी ट्रप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते. एखादा मोठा मासा अलगद या ‘ट्रॅप’मध्ये सापडतो व तिथून मग अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांची किंवा पैशांची मागणी अथवा मानसिक छळाला सुरुवात होते.

आपण जर कुठल्याशा मोहाला बळी पडलो आणि आपले स्वत्त्व हरवून बसलो, तर त्याचा दुष्परिणाम अत्यंत भीषण स्वरूपातही असू शकतो. याचाच अर्थ जबाबदारीच्या किंवा महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने कोणत्याही मोहाला बळी न पडण्याचा दृढनिश्चय करायला हवा अन्यथा आपल्या वागण्याचा, कृत्याचा फार मोठा फटका देशाला, राज्याला किंवा आपण ज्या संस्थेच्या, यंत्रणेच्या पदावर आहोत त्याला बसू शकतो. आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी असताना त्याबाबतची मोलाची माहिती प्राप्त करण्यासाठी आपले विरोधक किंवा शत्रू सर्व बाजूंनी आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करतात. आपली कमकुवत बाजू कोणती किंवा आपण कोणत्या मोहाला सहज बळी पडू शकतो, याचा अभ्यास करून तसा सापळा रचला जातो. आपण जर खंबीर असू, तर अशा क्षणांना आपण भुलणार नाही. पण जर मोहाला बळी पडलो, तर अघटित घडते.

हे सर्व येथे मांडण्याचे कारण म्हणजे पुण्यात संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालक पदावर काम करत असलेल्या संचालकाला दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत अटक केली आहे. डीआरडीओचे हे संचालक पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले व त्यातूनच पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला काही माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे आता दहशतवादी विरोधी पथकाने या संचालकावर मोठी कारवाई केली आहे. संरक्षण संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर हे पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हचे हस्तक असलेल्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपद्वारे व्हाॅइस मेसेज, व्हीडिओ कॉलने संपर्कात राहिले असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यासोबत डीआरडीओच्या शास्त्रज्ञपदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकीय माहिती ते पाकिस्तानला पुरवत असायचे. प्राथमिक अंदाजानुसार हनी ट्रॅपमध्ये सापडल्याने ते पाकिस्तानला माहिती देत असायचे, असा संशय आहे.

विशेष म्हणजे प्रदीप कुरुळकर यांनी सहा वर्षे भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केले. १९९८ मध्ये झालेल्या अणुचाचणीदरम्यान जे ३५ वैज्ञानिक होते, त्यात कुरुळकर यांचा समावेश होता. त्यांना २००० मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी विज्ञान दिन पुरस्कार मिळाला होता. २००२ मध्ये आत्मनिर्भरतेमध्ये उत्कृष्टतेसाठी डीआरडीओ अग्नी पुरस्कार, २००८ मध्ये आकाशसाठी पथ ब्रेकिंग संशोधन पुरस्कार, उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओचा पुरस्कार मिळाला होता. असा मोहरा पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील एका महिलेच्या संपर्कात आला. डीआरडीओची व्हिजिलेंस व इंटेलिजेंस टीम अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर नजर ठेवून होती. डीआरडीओ मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एटीएसने त्यांना अटक केली. हे प्रामुख्याने ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण असून ज्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो वापरून अडकला आणि त्यानंतर पाकिस्तानस्थित गुप्तचर अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आला. डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वासोबत काम करणारा अधिकारी पाकिस्तानच्या जाळ्यात अडकतो. ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून मोहाच्या क्षणांना भुलून, संमोहित होऊन पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवितो. हे सर्व चक्रावून सोडण्यासारखे आहे. म्हणूनच प्रत्येकाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या दोषांवर विजय मिळवायला हवा अन्यथा पुढे कडेलोट आहेच.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -