राजापूर (प्रतिनिधी) : ‘भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे. भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी व रोजगार निर्मितीबरोबरच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्यामुळे आज या प्रकल्पाला मोठे समर्थन मिळत आहे. मात्र तरीही बाहेरून येणारी काही मंडळी या प्रकल्पाला विरोध करून व प्रकल्प विरोधी वातावरण तयार करून कोकणातील आणि खासकरून राजापूर तालुक्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता अशा लोकांना या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्याची वेळ आली असून शनिवार ६ मे रोजी सर्व प्रकल्प समर्थकांचा भव्य असा रिफायनरी प्रकल्प समर्थन मोर्चा काढणार’, अशी माहिती भाजप प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी दिली.
‘आमचा हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसून या प्रकल्पाची असलेली गरज आणि असलेले समर्थन दाखविण्यासाठी आहे. या समर्थन मोर्चाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह सर्वपक्षीय समर्थक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. मात्र आता समर्थकांची शक्ती दाखवून देण्याची वेळ आली असून ती शक्ती आपल्याला ६ मे रोजी दिसेल असे राणे यांनी सांगितले. राजापूर तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. मात्र तरीही बाहेरून येणारी काही मंडळी प्रकल्पाच्या विरोधात नारा देत स्थानिकांना चुकीची माहिती देऊन भडकविण्याचा व वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत.
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी या प्रकल्पाच्या एकूणच समर्थनाची व कशा प्रकारे हा प्रकल्प तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासात महत्वाचा ठरू शकतो याची माहिती दिली. या प्रकल्पाला विरोधापेक्षा समर्थन अधिक असून काही बाहेरून येणारी मंडळी प्रकल्प विरोधाचा आभास निर्माण करत आहेत व तालुक्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी ६ मे रोजी कोण येतंय, कशासाठी येतंय, ते काय करणार आहेत हे आमच्यासाठी महत्वाचे नाही, आता प्रकल्पाला असलेले समर्थन दाखविण्याची खरी गरज असून त्यासाठीच आम्ही सर्व प्रकल्प समर्थक एकत्रित येऊन हा मोर्चा काढणार असल्याचे राणे यांनी सांगितले. ६ मे रोजी सकाळी ११ वाजता राजापूर येथील जवाहर चौक येथून हा समर्थन मोर्चा काढणार आहोत. रिफायनरी प्रकल्पावरून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्यासाठी येणाऱ्या लोकांना उत्तर देणारा हा मोर्चा असेल. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांचे नेते, सर्व प्रकल्प समर्थक संघटना सहभागी होणार असून कोणतेही गालबोट न लावता आम्ही हा मोर्चा काढू व समर्थनाची ताकद दाखवू असेही राणे यांनी सांगितले.