
मुरूड : जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांपासून किल्ला पाहण्यासाठी बंद केला होता. या काळात किल्ल्यातील अंतर्भागातील माहिती देणारे स्थानिक गाइड हे पर्यटकांकडून वाट्टेल तसे पैसे उकळत होते. सदर वृत्त प्रसिद्ध होताच शासनाने अशा गाइड्सवर बंदी आणली. कोरोना काळानंतर पुन्हा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी मात्र किल्ला पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना आत किल्ल्याची माहिती देणारे गाइड नसल्याने माहिती शिवाय परतावे लागत आहे.
जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पुरातत्व विभागाकडून प्रवेश कर आकारला जातो. लाखों पर्यटकांचा करोडो रुपयांचा कर शासनाला मिळत आहे. तरीही पुरातत्व विभागाकडून या किल्ल्याची माहिती मिळावी अशी कोणतीही सोय केलेली नाही. तरी या किल्ल्यावर शासनाने अधिकृत गाइड नेमावे व त्यांना अधिकृत माहिती कर आकारणी करावी. तसेच किल्ल्याच्या आत मार्गदर्शक फलक लावण्यात यावे व प्रत्येक ठिकाणी माहिती फलक लावावे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
किल्ल्यातील इतिहास कळत नसल्याने माहिती शिवाय परत जावे लागते आहे. या ठिकाणी माहिती फलक व मार्गदर्शक फलक लावावे नाहीतर अधिकृत गाइड नेमावे अशी आमची मागणी आहे. - श्रीकांत फुटाणे शिक्षक, पाथर्डी, अहमदनगरया किल्ल्याला बाहेरून पाहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून किल्ला बाहेरून पाहता येईल, कारण आतील माहिती मिळत नाही. जर शासन प्रवेश कर आकारणी करत आहे तर किल्ल्याची माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. - मनोज वाघ, कल्याण