सुरत : कामगार, रिक्षाचालक आणि गाळेधारकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून १५०० डमी कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल २ हजार ७०० कोटींचा जीएसटी घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने अधिकारीही चक्रावले आहेत. केवळ गुजरातच नाही तर अन्य १५ राज्यांमध्ये या कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटी घोटाळ्यात कोट्यावधी रुपयांचा वापर कसा झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये ३५ लोक सामील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यापैकी १९ जण पकडले गेले आहेत, तर १६ अजूनही फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १,५०० डमी कंपन्या तयार करून २,७०० कोटींचा जीएसटी घोटाळा करणाऱ्या सुफियान कपाडियाला गुजरातमधील सुरतमध्ये अटक करण्यात आली आहे. या सूत्रधाराने एकट्याने ९०१ कोटींचा जीएसटी घोटाळा केला.२ वर्षांपूर्वी सुफियानला बनावट बिलिंग पद्धती वापरून इनपुट टॅक्स क्रेडिटचे खोटे दावे देऊन ४९६ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यांतून १४ लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर कपाडियाला पकडण्यापूर्वी आणखी चार जणांना पकडण्यात आले. उस्मान गनी, आनंद परमार, फैसल खोलिया आणि आफताब सोलंकी अशी त्यांची नावे आहेत.
या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या उस्मानला सर्वप्रथम भावनगर येथून अटक करण्यात आली. तो भावनगर आणि सुरत येथून जीएसटी चोरी करणारी टोळी चालवत असे. या घोटाळ्याचा सूत्रधार सुफियान कपाडिया हा फरार होता, त्याला इकॉनॉमिक सेलने सुरतमधून अटक केली आहे. सुफियानने सुरतमध्ये ८ बनावट कंपन्या तयार केल्या होत्या.
फसवणूक करणाऱ्यांनी या घोटाळ्यात संशयित नसलेल्या व्यक्तींचा वापर केला. कामगार, रिक्षाचालक आणि गाळेधारकांकडून आधार आणि पॅन कार्ड मिळवले. त्यानंतर या कागदपत्रांचा वापर करून बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि कर चुकवण्यासाठी खोटी बिले तयार करण्यात आली. आरोपींनी केमिकल आणि रद्दी व्यवसायाच्या नावाखाली बनावट बिलिंग केले.
पोलिसांना विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे एबी एंटरप्राइज, बारिया एंटरप्राइज, गणेश एंटरप्राइज, जय अंबे एंटरप्राइज अशा अनेक डमी कंपन्या उघडण्यात आल्या. जीएसटी परवाना घेऊन त्या फर्मच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले. बँक खाते वापरून बेकायदेशीरपणे व्यवसाय करून इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यात आले.
या गटाने प्रामुख्याने भावनगर, अहमदाबाद, मोरबी, सुरत, जुनागढ येथे त्यांची बेकायदेशीर कामे केली. पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, १,५०० बनावट कंपन्यांपैकी २५० हून अधिक कंपन्यांची गुजरात व्यतिरिक्त अन्य १५ राज्यांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे.