मुंबई (प्रतिनिधी) : बेस्टच्या मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड बस आगारातील उपाहारगृह बुधवार ३ मेपासून अचानक बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेर बसून जेवण्याची वेळ आली आहे. उपाहारगृहाचा कंत्राटदार सोडून गेल्याने व बेस्ट उपक्रमाने उपाहारगृहाला टाळे लावल्याने ही वेळ कर्मचाऱ्यांवर आली असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
बेस्टच्या मुलुंड बस आगारातील कंत्राटदार हा अचानक कंत्राट सोडून गेल्याने व नवीन कंत्राटदार बेस्ट उपक्रमाने न नेमल्याने बेस्ट उपक्रमाने उपहारगृहाला टाळे लावले. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसून व आगारातील इतर ठिकाणी बसून जेवण्याची वेळ आली. सध्या उपाहारगृहांची कोणतीही पॉलिसी नसल्याने व कंत्राटदारांना कठीण नियम लागू केल्याने कोणताही कंत्राटदार बेस्टसोबत काम करण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांचे होणारे हाल अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? कामगारांना इतकी वाईट वागणूक मिळत असेल, तर पुढे होणाऱ्या परिणामांचा उपक्रमाने विचार करावा, कामगारांचा अंत पाहू नये, मुलुंड बस आगार अधिकाऱ्यांनी सदर बाबीची दाखल न घेतल्यास होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी उपक्रमाची राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा बेस्ट कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी दिला.