निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याची पत्रकार परिषदेत केली घोषणा
मुंबई : माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारले तरी कोणतेही जबाबदारीचे पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतल्याचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला.
२ मे रोजी पुस्तक प्रकाशनात मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती. पण त्यामुळे जनमाणसांत तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेली जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. या निर्णयाचा मी फेरविचार करावा याकरता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, चाहते यांनी मला आवाहन केलं. तसेच देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून इतर सहकारी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती केली.
लोक माझे सांगाती, हे माझ्या प्रदीर्घ आणि समाधानी सार्वजनिक जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. या लोकांच्या प्रेमानं मी भारवून गेलो. तुमच्या सर्वांकडून आलेले आवाहन, आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून घेण्यात आलेला निर्णय यावरून मी सर्वांचा मान राखत मी माझा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारले तरी कोणतेही जबाबदारीचे पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे. पक्षात नवं नेतृत्त्व निर्माण होईल यासाठी काही संघटनात्मक बदल मी करणार आहे, असे पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे पत्रकार परिषदेस अनुपस्थित होते. त्याबाबत विचारले असता, शरद पवार यांनी म्हटले की, निवृत्त होण्याचा विचार व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले होते. अजित पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. आज अजित पवार इथं नाहीत म्हणजे ते नाराज असं म्हणण्याचं काहीच कारण नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझ्या सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर देशभरात राष्ट्रवादी नेते-कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आग्रह धरला. राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. तर नेत्यांनी राजीनामा सत्र सुरु ठेवले होते. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील लोकांनी फोन करून, त्यांना प्रत्यक्ष भेटून विनवणी केली. तर काहींनी रक्तांने पत्र लिहून निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करताना शरद पवार यांनी त्यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाईल यासाठी तीन दिवसांचा कालावधी मागितला होता.
दरम्यान, नविन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी एक समिती गठित केली. या समितीने आज एकमताने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीत पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना निर्णय बदलावा यासाठी आग्रह धरला आहे. आज कोअर कमिटीने त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी थोडा वेळ मागितल्याचे सांगितले होते.