- मंजिरी ढेरे
विविध धर्म मनुष्याला प्राण्यांमधला एक न राहता मनुष्यप्राणी म्हणून कसं जगावं याची शिकवण देतात. जीवनात शांतता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतार्थता असेल तर माणूस वेगळ्याच उंचीवर पोहोचू शकतो. मात्र त्यासाठी त्याच्या विचारांची बैठक तेवढी पक्की आणि व्याप्ती तेवढी अथांग हवी. माणूस म्हणून जन्माला येण्यात आपलं काहीही योगदान नसतं. मात्र हा जन्म सार्थकी लावण्यासाठी आयुष्यभर नेमका विचार आणि विवेकपूर्ण आचार असणं आवश्यक असतं. बौद्ध धर्म नेमकी हीच शिकवण देतो. हा धर्म समजण्यास अगदी साधा आणि आचरण्यास अगदी सोपा आहे. त्यामुळेच जगभर बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि या धर्माचा प्रणेता भगवान गौतम बुद्ध आणि त्याचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचले. अशा या बुद्धाचा जन्मदिवस वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो. बौद्ध धर्मीयांसाठी ही बौद्धपौर्णिमा विशेष महत्त्वाची आहेच, पण अन्य धर्मांमधले शांतता आणि अहिंसेचे पुजारीदेखील हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बौद्धधर्मीयांची मोठी संख्या असणाऱ्या जगातल्या चीन, जपान, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया, नेपाळ, इंडोनेशिया अशा जवळपास १८० देशांमध्ये हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा होतो. विशेष म्हणजे बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना याच दिवसाशी संबंधित असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.
मानवतावादी विचारांमुळे गौतम बुद्ध घराघरांत पोहोचले. हा सत्याच्या शोधासाठी घरादाराचा, सुख-वैभवाचा त्याग करून घोर तपश्चर्या करणारा महापुरुष होता. तब्बल सात वर्षं कठोर साधना केल्यानंतर त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. बुद्ध पौर्णिमा हाच तो दिवस. म्हणूनच घरामध्ये दिवे लावून, फुलांनी घर सजवून बौद्धधर्मीय हा दिवस साजरा करतात. यानिमित्ताने पवित्र धर्मग्रंथांचं वाचन, श्रवण यांसारखे कार्यक्रमही पार पडतात. विहारात जाऊन गौतम बुद्धाच्या प्रतिमेला फुलं अर्पण करणं, सभोवती दिव्यांची आरास करणं असे उपचार या दिवशी पार पडतात. बोधिवृक्षाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे या दिवशी या वृक्षाच्या फांद्यांवर पताका बांधल्या जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातलं जातं. या दिवशी बौद्ध परंपरेतल्या महत्त्वपूर्ण अशा लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी आदी पवित्र स्थळी बौद्धधर्मीयांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दानधर्म करून आणि उपवास ठेवून हा दिवस साजरा केला जातो. गौतम बुद्धाने समाजात अनेक प्रकारची दु:खं पाहिली आणि या दु:खांचं कारण शोधण्यास ते बाहेर पडले. दु:खाचं मूळ शोधताना लोभ, हव्यास, तृष्णा यांसारखे दुर्गुण यास कारक असल्याचं त्यांना समजलं. अर्थात हा मनुष्यस्वभाव असला आणि बहुसंख्य माणसांच्या अंगी हे दुर्गुण असले तरी ते दूर करून शांततापूर्ण पद्धतीने आयुष्याचा आनंद घेता येतो, हे तत्त्व त्यांनी समजावून सांगितलं. आजच्या काळातील वाढता हव्यास, प्रलोभनांना बळी पडणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता या साधकबाधक विचारांच्या प्रसाराची किती गरज आहे हे सहज लक्षात येईल.
ईश्वर, स्वर्ग, नरक अशा कोणत्याही कल्पनेवर भगवान बुद्धांचा विश्वास नव्हता. ते पूर्णपणे निरिश्वरवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी होते. परमेश्वर, स्वर्ग, नरक या कल्पना न मानतादेखील धर्म असू शकतो असं सांगणारा हा योगी जगाच्या इतिहासातील पहिला पुरुष आहे. त्यांच्यापूर्वी झालेल्या कणाद, कपिल, चार्वाक यांच्या निरिश्वरवादाचा परिणाम त्याच्यावर झाला असल्याचा संभव आहे. त्यांच्याकडून त्यांनी कदाचित निरिश्वरवादाच्या कल्पना घेतल्या असतील; परंतु त्यामध्ये करुणेसारख्या एका शाश्वत मूल्याची भर घातली आणि जगाला एक नवा धर्म दिला. अर्थात बुद्धाने म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे नीती. नीती ही नेहमी सामाजिक असते. दोन व्यक्तींमध्ये समतेवर आधारलेले परस्परसंबंध म्हणजेच सामाजिक नीती. बुद्धाने धर्माची कल्पना सामाजिक नीतीशी बांधली आहे आणि त्याचं हे कार्य महत्त्वाचं वाटतं.
बुद्धाच्या काळात चातुर्वर्ण्य पद्धती बळकट होऊ लागली होती. त्यामुळे जातीव्यवस्था, सामाजिक विषमता यांना धर्माच्या नावाखाली खतपाणी घातलं जात होतं. अशा या काळात गौतम बुद्धाने चातुर्वर्ण्य व्यवस्था किंवा जातीव्यवस्थेविरुद्ध बंडाचं निशाण उभं केलं. मानवी समता हे शाश्वत सत्य आहे असा विचार त्यांनी मांडला. बुद्धाने वेदांनादेखील आव्हान दिलं. वेद हे ईश्वरनिर्मित आहेत आणि त्यामुळे वेदातील प्रत्येक शब्द हा पवित्र आहे या कल्पनेला त्यांनी विरोध केला. त्यांचा ईश्वराच्या कल्पनेलाच विरोध होता. त्यामुळे वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, ही कल्पना त्यांना मान्य होणं शक्य नव्हतं. शिवाय बुद्ध पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यवादी होते. प्रत्येक विचार बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहावा, अशी त्याची भूमिका होती. वेदातील प्रत्येक शब्द अंतिम सत्य आहे, हे त्यांना मान्य होणं शक्यच नव्हतं. बुद्धाने मानवी समतेचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला ही खरोखरच भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. भगवान बुद्ध हे भारताच्या इतिहासातील पहिले क्रांतिकारक पुरुष आहेत, अशा शब्दातच त्यांच्या कार्याचं वर्णन करावं लागेल.
गौतम बुद्ध यांनी समाजाला काही तत्त्वं दिली. त्यात प्रज्ञा आणि करुणा या मूलभूत तत्त्वांचा समावेश आहे. प्रज्ञेला करुणेचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि करुणेला प्रज्ञेची बैठक असली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. प्रज्ञेवाचून करुणा आंधळी असते, तर करुणेवाचून असणारी प्रज्ञा लंगडी किंवा घातक ठरण्याचा संभव असतो, असं त्यांनी सांगितलं. ही दोन्ही मूल्यं घातक ठरण्याचा संभव असतो. ती हातात हात घालून वावरली पाहिजेत. केवळ प्रज्ञा माणसाला नैतिक मूल्य देऊ शकत नाही. अनेक वेळा करुणेशिवायची प्रज्ञा घातक ठरण्याचा संभव असतो. भारताने गेली २००० वर्षे याचा अनुभव घेतला आहे. खेड्यापाड्यातील माता अपत्याला ज्वर झाला तर गंडे, धागेदोरे असे इलाज करत बसली, तर केवळ तिच्यातील करुणा त्या मुलाला वाचवू शकणार नाही. त्यासाठी आईने डॉक्टरांकडे जाऊन शास्त्रीय पद्धतीने उपचारच केले पाहिजेत. त्यामुळेच भगवान बुद्धाने प्रज्ञा आणि करुणा या दोन्ही मूल्यांवर भर देताना ही मूल्ये हातात हात घालून वावरली पाहिजे, यावर भर दिला. त्यांचं हे तत्त्व सागरातल्या दीपगृहाप्रमाणे आजच्या जगाला मार्गदर्शक ठरेल यात शंका वाटत नाही.
त्या काळामध्ये भगवान बुद्धाने केलेला अहिंसेचा पुरस्कारदेखील आजच्या युगाला मार्गदर्शक ठरणारा आहे. भगवान बुद्धापूर्वी भगवान महावीरांनीही अहिंसेचा पुरस्कार केला होता. भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये फक्त तीस वर्षांचं अंतर होतं. भगवान बुद्धाने भगवान महावीरांकडून अहिंसेचं तत्त्व घेतलं; परंतु त्यामध्ये काही फरक केला. त्यामुळे बौद्ध धर्म हा त्या काळात सर्व आशियाभर शांततामय मार्गाने पसरला. गौतम बुद्धाचं अहिंसेचं तत्त्वज्ञान आजच्या जगाने स्वीकारायला हवं. आजच्या जगाला अहिंसेची गरज आहे, तेवढी कदाचित यापूर्वी कधीही नसेल. आताच्या युद्धाचं स्वरूप अत्यंत भयानक बनलं आहे. आता युद्ध झालं तर सर्व जगाचं स्मशान होईल आणि शेकडो वर्षांच्या परिश्रमातून विकसित केलेली मानवी संस्कृती कायमची गाडली जाईल. त्यामुळे आजच्या जगाला भगवान बुद्धाच्या अहिंसेची नितांत गरज आहे. हे सर्व लक्षात घेता, या पवित्र दिवसाच्या निमित्ताने भगवान बुद्धाने सांगितलेल्या प्रज्ञा, करुणा आणि कलात्मक सौंदर्य या तीन शाश्वत तत्त्वाचा अंगीकार करणं आणि त्याच्या आधारे मानवी जीवन समृद्ध, सुखी आणि सुंदर करणं आपल्या हातात आहे. प्रगतीचा हा मार्ग प्रत्येकाने अनुसरला, तर आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होईल आणि समाजातील सर्वच घटकांचं जगणं सुकर होईल.