Monday, June 16, 2025

कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! दर मंगळवारी पाणी येणार नाही

कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! दर मंगळवारी पाणी येणार नाही

पुढील तीन महिने केडीएमसी क्षेत्रात प्रत्येक मंगळवारी पाणी पुरवठा बंद रहाणार


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ऐन उन्हाळ्यात पुढील तीन महिने येत्या मंगळवारपासून प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी २४ तास पाणी पुरवठा बंद रहाणार असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जाहिर केले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने विभागातील नागरिकांना केले आहे.


पालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यात ऑगस्ट २०२३ पर्यंत नियोजित पाणी पुरवण्याचा विचार करता आजमितीस ३२ टक्के घट निर्माण झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण मधील शहाड, अडीवली, आंबीवली, टिटवाळा तसेच डोंबिवली पूर्व-पश्चिम या भागात प्रत्येक सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ पर्यंत पालिकेच्या जलशुद्धी केंद्रातून पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून प्रत्येक मंगळवारी पाणी पुरवठा बंद रहाणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


पुरेसा पाऊस पडेपर्यंत बारवी धरणातील पाणीसाठा समप्रमाणात असावा. कल्याण, डोंबिवली शहरांची पाण्याची तहान येत्या तीन महिन्याच्या कालावधीत काटकसर न करता भागवता यावी या उद्देशाने शासन आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा दर मंगळवारी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण पॅसिफिक महासागरातील अलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धरणांमधील आत्ताची पाण्याची उपलब्धता पाहता शहरांना ऑगस्ट अखेरपर्यंत नियमित पाणी पुरवठा करताना ३२ टक्के पाण्याची तूट येण्याची शक्यता आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी ठाणे पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी ९ मे पासून कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा दर मंगळवारी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे


पाणी जपून वापरण्याचे आवाहन


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणी कपातीच्या कालावधीत कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


पाण्याची मागणी वाढली


उन्हाच्या चटक्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आता पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment