खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेले व अपघातग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच पुरती बिघडली आहे. उपजिल्हा रुग्णालयात आस्थापनेत ९३ पदे मंजूर असतानाही त्यातील ५१ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत यंत्रणेवर ताण पडत आहे. रिक्त पदांचा थेट परिणाम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवरती पडत आहे. रुग्णालयातील २ सुसज्ज रुग्णवाहिकाही चालकांअभावी धळखात पडल्या आहेत.
महामार्गावर अपघात घडल्यास उपचारासाठी रुग्णांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. मध्यवर्ती ठिकाणचे रुग्णालय रुग्णांसाठी सर्वच दृष्टीने सोयीचे ठरत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या रुग्णांनाही खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. रुग्णालयाच्या आस्थापनेतील मंजूर पदे भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कुठल्याच ठोस हालचाली केल्या जात नाहीत. याचमुळे वर्षानुवर्षे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर रिक्त पदांचा ताण यंत्रणेवर पडत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणीत उपजिल्हा दर्जाचे असलेल्या रुग्णालयात कार्यरत मंजूर पदे ९३ असताना त्यातील ५१ पदे रिक्त आहेत.
वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ प्रत्येकी १, भूलतज्ज्ञ २, वैद्यकीय अधिकारी ५, सहा. अधीक्षक १, व. लिपिक- १, क. लिपिक २, बाह्यरुग्ण लिपिक ३, नर्स व्यवस्थापिका २, अधिपरिचारिका दंत १, बालरोग अधिपरिचारिका १, औषध निर्माण अधिकारी २, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, वाहनचालक, दंत यांत्रिक, बाह्यरुग्णपरिचर, शस्त्रक्रिया परिचर प्रत्येकी १, तर कक्षसेवक ६, व्रणोचारक- १, सफाई कामगार- ८, दंत सहाय्यक १ अशी ५१ पदे रिक्त आहेत.
वैद्यकीय अधिकारी वर्ग २ मधील आस्थापनेत दोन डॉक्टर बंधपत्राने कार्यरत आहेत. तर वाहनचालकांच्या दोन जागांपैकी एक जागा कंत्राटी पद्धतीने भरली आहे. १० सफाई कामगार कंत्राटी ठेकापद्धतीने रिक्त पदांवर काम करत असून ते कधीही सेवामुक्त होऊ शकतात. रिक्त पदांमुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.